अकोला : शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या अडचणीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. कारण बच्चू कडू यांच्याविरोधात खटला चालवण्याचे आदेश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी दिले आहेत. बनावट दस्ताऐवज बनवून शासकीय निधीचा (Government funds) अपहार केल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीने बच्चू कडू यांच्याविरोधात राज्यपालांकडे तक्रार केली होती. त्यानंतर राज्यपालांनी अकोला पोलीस अधीक्षकांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता बच्चू कडू यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.
शालेय शिक्षण राज्यमंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर रस्ते निधीबाबत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आलाय. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. बच्चू कडू यानी बनावट दस्ताऐवज बनवून अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर शासकीय निधी वळता करुन घेत अपहार केला, असा आरोप वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आलाय. याबाबतची सविस्तर माहिती राज्यपाल कोश्यारी यांना देण्यात आलीय. संबंधित कागदपत्रे तपासल्यानंतर आता राज्यपालांनी बच्चू कडू यांच्याविरोधात खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणात तत्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांचंही नाव समोर आलं आहे. काही इतर जिल्हा मार्ग आणि ग्राम मार्ग हे शासन क्रमांक नसलेल्या रस्त्यांच्या कामाची यादी जिल्हा परिषदेला पाठवून बच्चू कडू यांनी सरकारी निधीचा अपहार केल्याचं समोर आलं. याबाबतचे पुरावे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांनी समोर आणले. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत राज्यपालांची भेट घेत योग्य कारवाईची मागणी केली होती.
राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. चांदूरबाजार प्रथमवर्ग न्यायालयाने 11 फेब्रुवारी रोजी हा निर्णय दिला. 2014च्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्रं सादर करताना बच्चू कडू यांनी मुंबईतील फ्लॅटची माहिती लपवली होती. या प्रकरणी भाजपचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी कोर्टात धाव घेतली होती. या प्रकरणाचा आज निकाल आला असून बच्चू कडू यांना शिक्षा सुनावण्यात आली.
दरम्यान, विधानसभा निवडणूक लढवताना 2014 मध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना मुंबईच्या या घरावर आम्ही कर्ज घेतले होते. त्या घराचा उल्लेख करण्याऐवजी कर्ज घेतलेल्या रकमेचा उल्लेख केला होता. हा काही गंभीर प्रकार नव्हता. मात्र या प्रकरणात न्यायालयाने आज जो काही चुकीचा निर्णय दिला आहे. त्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.
इतर बातम्या :