मुंबई : “मुख्यमंत्रीजी घर सोडा आणि बाहेर पडा, शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेले हाल “online” बघता येणार नाही,” अशी टीका मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या परतीच्या पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. त्यामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. परिणामी हातातोंडाशी आलेले सोन्यासारखे पीक मातीमोल झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर धाय मोकलून रडण्याची वेळ आली आहे. यावरुन बाळा नांदगावकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. (Bala Nandgaonkar Criticizes CM Uddhav thackeray on Farmers crops loss)
“मुख्यमंत्रीजी घर सोडा आणि बाहेर पडा, आम्ही तुमच्यावर थेट टीका करण्याचे टाळत आलो. पण आता शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेले हाल “online” बघता येणार नाही.
थेट बांधावर जाऊन ते अश्रू पुसा आणि त्यांना त्वरित आर्थिक मदत दया, अन्यथा लोकांचा “ठाकरे”नावावरील विश्वास उडेल,” असा टोला बाळा नांदगावकरांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. औरंगाबादमध्ये ‘टीव्ही 9 मराठी’ने या शेतकऱ्यांशी संवाद साधल्याचा एक व्हिडीओ रिट्विट करत ही प्रतिक्रिया दिली.
@CMOMaharashtra ,@mnsadhikrut ,@abpmajhatv ,@News18lokmat ,@zee24taasnews ,@TV9Marathi pic.twitter.com/kAdGk35vST
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) October 15, 2020
मराठवाड्यात यंदा नेहमीच्या सरासरीपेक्षा खूपच जास्त प्रमाणात पाऊस कोसळला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांत शेतकऱ्यांना व्यवस्थित पीक घेता आले नव्हते. यानंतरही शेतकऱ्यांनी उमेद न हारता दुबार-तिबार पेरणी गेली होती. पिकांनी तग धरल्यामुळे या मेहनतीचे चीजही होताना दिसत होते. मात्र, परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची ही सर्व मेहनत पाण्यात घालवली आहे.
औरंगाबादमध्ये या शेतकऱ्यांनी मका, सोयाबीन आणि कपाशीचे पीक घेतले होते. परंतु, कालपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे. आम्ही काही दिवसांपूर्वी मक्याचे पीक घेतले. मात्र, बाजारात त्याला भाव नाही. यानंतर कपाशीचे पीक घ्यायला गेलो तर संपूर्ण शेतीच पाण्याखाली गेली. आता आम्ही जगायचे कसे, आमच्या मुलाबाळांचे शिक्षण कसे करायचे, असा सवाल एका उद्विग्न शेतकऱ्याने विचारला. (Bala Nandgaonkar Criticizes CM Uddhav thackeray on Farmers crops loss)
संबंधित बातम्या :
शेतकऱ्यांवर आभाळ कोसळलं, गाळ-चिखलात लोळून धाय मोकलून रडण्याची वेळ