राज ठाकरेंना पक्षातून घालवण्यात कुणाचा हात? काय घडलं त्यावेळी?; एकनाथ शिंदे यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

| Updated on: Aug 19, 2024 | 1:51 PM

"बाळासाहेब ठाकरेंसोबत राज ठाकरेचं काम करायचे. 1995 मध्ये ज्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीत बाळासाहेब ठाकरेंचा संपूर्ण प्रचार आणि पक्षासाठी वातावरण निर्मिती राज ठाकरेंनीच केली", असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

राज ठाकरेंना पक्षातून घालवण्यात कुणाचा हात? काय घडलं त्यावेळी?; एकनाथ शिंदे यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Follow us on

CM Eknath Shinde On Raj Thackeray : अवघ्या काही महिन्यातच विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठा खळबळजनक दावा केला आहे. राज ठाकरेंनी शिवसेना सोडावी ही बाळासाहेब ठाकरेंची इच्छा नव्हती. उद्धव ठाकरे यांनी त्यांना पक्षातून बाजूला केलं, असे विधान एकनाथ शिंदे यांनी केले. एकनाथ शिंदे यांच्या विधानामुळे आता सर्वत्र चर्चा रंगली आहे.

एकनाथ शिंदे यांनी नुकतंच ANI या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर भाष्य केले. “उद्धव ठाकरे लाडकी बहिण योजनेवरुन टीका करतात. ते अनेकदा लाडकी बहीण योजना आणली, आता लाडका भाऊ योजना कधीपासून आणणार आहात? तर आम्ही लाडका भाऊ योजनाही सुरु केली”, असा टोलाही एकनाथ शिंदेंनी लगावला.

“राज ठाकरे यांना बाजूला करण्यात आले”

“राज ठाकरे जेव्हा तुमच्यासोबत होते, तेव्हा त्यांचं शिवसेना सोडण्याचे कारण काय होतं? बाळासाहेब ठाकरेंसोबत राज ठाकरेचं काम करायचे. 1995 मध्ये ज्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीत बाळासाहेब ठाकरेंचा संपूर्ण प्रचार आणि पक्षासाठी वातावरण निर्मिती राज ठाकरेंनीच केली. तेव्हा ते एकत्र होते. पण जेव्हा राज ठाकरेंना जबाबदारी देण्याची वेळ आली तेव्हा उद्धव ठाकरे यांची महत्त्वकांक्षा जागृत झाली. जशी काही वर्षांपूर्वी त्यांची मुख्यमंत्री बनण्याची इच्छा झाली होती. राज ठाकरे यांना बाजूला करण्यात आले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्ष करण्याचा प्रस्ताव राज ठाकरे यांना मांडायला लावला. यानंतर त्यांना बाजूला केले गेले”, असा गंभीर आरोप एकनाथ शिंदेंनी केला.

हे सुद्धा वाचा

“राज ठाकरेंनी पक्ष सोडावा अशी बाळासाहेबांची इच्छा नव्हती”

पण तरीही राज ठाकरे म्हणायचे की ज्या ठिकाणी शिवसेना कमकुवत आहे, त्या ठिकाणी काम करण्याची जबाबदारी मी घेतो. पण, उद्धव ठाकरेंच्या मनात असुरक्षितता होती. त्यामुळे त्यांना ती देखील जबाबदारी देण्यात आली नाही. त्यामुळे ते बाजूला झाले. राज ठाकरेंनी पक्ष सोडावा अशी बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा नव्हती, असाही दावा एकनाथ शिंदेंनी केला.

“राज ठाकरे सर्व मिळवण्यासाठी पात्र होते”

यानंतर एकनाथ शिंदे यांना विधानसभेत मनसे युतीला पाठिंबा देणार का? याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी लोकसभेला त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला होता. त्यांनी आमच्या मंचावरुन भाषणही केलं होतं, असे एकनाथ शिंदे म्हणाले. त्यानंतर त्यांना पण आता विधानसभेत ते तुमच्या बरोबर दिसत नाही, असे विचारले असता एकनाथ शिंदेंनी ते आता विरोधात तरी कुठे आहेत? अजून बराच वेळ बाकी आहे. त्यामुळे पुढे बघू काय होतं ते? पण त्यावेळी राज ठाकरे हे सर्व काही मिळण्यासाठी नक्कीच पात्र होते. ते काम करत होते, असे म्हटले.