मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना दोन गटात विभागली आहे. उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले आहे. शिंदे गटाला मिळणारा पाठिंबा वाढत असतानाच उद्धव ठाकरे आणखी एक जबरदस्त झटका बसला आहे. बाळासाहेबांची(Balasaheb Thackeray) सावली अशी ओळख असलेल्या चंपासिंह थापा(Champa Singh Thapa ) यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला आहे.
चंपासिंह थापा हे बाळासाहेबांचे अत्यंत विश्वासू व्यक्ती होते. चंपासिंह थापा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत चंपासिंह थापा यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. एवढी वर्ष बाळासाहेबांसोबत काम केल्यानंतर थापा यांनी उद्धव ठाकरेंसह न राहता शिंदे सोबत जाण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
थापा यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचाराबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळेच उद्धव ठाकरेंचे विचार न पटल्याने थापा यांनी आमच्या सोबत येण्याचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर चंपासिंह थापा चर्चेत आले. थापा हा बाळासाहेबांच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांच्या सोबतच होता. बाळासाहेबांचे निधन होण्यापूर्वी त्यांनी शेवटचा संवाद थापा याच्यांशीच केला होता.
भांडूपमधील तत्कालीन नगरसेवक दिवंगत के टी थापा यांच्यामुळे थापा हे बाळासाहेबांचे सेवक म्हणून रुजू झाले. थापा हे बाळासाहेबांची सावली बनून त्यांच्या सोबत राहिले होते.
बाळासाहेबांनी थापा यांना कायम मातोश्रीवर ठेवण्याचे उद्धव ठाकरेंना सांगीतले होते. थापा यांना बाळासाहेबांनी कुटुंबातील सदस्याचा दर्जा दिला होता.