अहमदनगर : सत्ता बदलली की मारली उडी असं राजकारण करताना उड्या मारायचं काम आपण करत नाही. घरावर संकट आले म्हणून पळून जायचं का? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केला.
आज संगमनेरमध्ये आयोजित महिला मेळाव्यात बोलताना थोरातांनी (Balasaheb Thorat) पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांवर टीका केली. त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील आणि श्रीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
काही दिवसांपूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. तर आज भाऊसाहेब कांबळेंनी ही शिवबंधन बांधलं. त्यावरुन बाळासाहेब थोरात यांनी नाव न घेता हल्ला चढवला.
राजकारण करताना उड्या मारायचं काम आपण करत नाही. सत्ता बदलली की मारली उडी. घरावर संकट आले म्हणून पळून जायचं का? असा सवाल बाळासाहेब थोरातांनी केला. मी भक्कम पाय रोवून उभा आहे, म्हणूनच सोनिया गांधींनी विश्वासाने माझ्यावर जबाबदारी टाकली. आता फक्त संगमनेरची जबाबदारी तुम्ही सांभाळा, मी राज्य सांभाळतो, असं भावनिक आवाहन बाळासाहेब थोरात यांनी केलं.
संगमनेर तालुक्यातील महिलांचा मेळावा आज पार पडला. दूध संघाच्या प्रांगणात झालेल्या या मेळाव्याला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. दूध उत्पादक महिलांशी संवाद साधताना बाळासाहेब थोरात यांनी विकास कामांचा पाढा वाचला. माझ्यावर राज्याची जबाबदारी आहे, माझा मतदातसंघ आता तुम्हीच सांभाळा असं आवाहन त्यांनी महिलांना केलं.