पुणे : मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने काँग्रेसचे भोरचे आमदार संग्राम थोपटे (Balasaheb Thorat on Sangram Thopte Supporters Ruckus) यांच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयावर दगडफेक केली. मात्र आमदार थोपटे यांनी या तोडफोडीची कल्पना नसल्याचं म्हणत, झाल्या प्रकाराचा निषेध व्यक्त केला. या प्रकारानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आमदार संग्राम थोपटे यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. संग्राम थोपटे यांचा योग्य वेळी योग्य सन्मान केला जाईल, असं बाळासाहेब थोरात यांनी टीव्ही 9 मराठीला सांगितलं.
“संग्राम थोपटे चांगला कार्यकर्ता आहे, चांगला आमदार आहे. पिढ्यान पिढ्या काँग्रेसशी एकनिष्ठ कुटुंब आहे. त्यांचे वडीलही मंत्रिमंडळात होते. मात्र महाराष्ट्रात तीन पक्षांचं सरकार आहे, त्यामुळे वाट्याला आलेल्या जागांचा ताळमेळ घालताना कसरत करावी लागते हे खरं आहे. त्यांना मंत्रिपद देऊ शकलो नाही. कार्यकर्त्यांना राग आहे. मी संग्राम थोपटेंशी बोललो. त्यांचा योग्य वेळी योग्य सन्मान केला जाईल. आमच्या कुटुंबातील ही गोष्ट आहे, चर्चेने प्रश्न सोडवू”, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
खातेवाटपावरुन धुसफूस?
दरम्यान, खातेवाटपावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीत धुसफूस नाही, असं थोरात म्हणाले. तीन पक्षांचं सरकार असल्याने प्रत्येक पक्षाला मर्यादित जागा आल्या आहेत. त्यामुळे तणाव असतोच, तो समन्वयाने मिटवला जातो. आमचं तीन पक्षांचं सरकार आहे. त्यामुळं मंत्रिपदे कमी वाट्याला आली. मंत्रिपदावरुन कुठेही वाद नाही. खातेवाटप आज होईल. चर्चा करुन निर्णय घेतला जात आहे, असंही बाळासाहेब थोरातांनी सांगितलं.
दगडफेकीच कल्पना नाही : संग्राम थोपटे
मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात काँग्रेस भवनची तोडफोड केली. मात्र संग्राम थोपटे यांनी या तोडफोडीविषयी मला काहीच कल्पना नाही. हा प्रकार चुकीचा असल्याचं सांगत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. तीन वेळा आमदार झाल्याने मंत्रिपदाची इच्छा होती, असं थोपटे (Sangram Thopte on Supporters Ruckus) म्हणाले.
तोडफोड ही काँग्रेसची परंपरा नाही. कोणी दगडफेक केली, याची वस्तुस्थिती तपासली पाहिजे. हे कार्यकर्ते शहरातले आहेत की ग्रामीण भागातील आहेत, हे तपासावे लागेल. त्याचबरोबर आम्हाला बदनाम करण्यासाठी विरोधी पक्षातील कोणाचं कटकारस्थान आहे का, याचाही शोध घेत असल्याचं संग्राम थोपटे यांनी सांगितलं.
(Balasaheb Thorat on Sangram Thopte Supporters Ruckus)