पहाटेचा शपथविधी | “पवारांना विचारुन सरकार स्थापन केलं असतं तर सरकार पडलं नसतं”, पाहा कुणी केला दावा

| Updated on: Feb 15, 2023 | 3:12 PM

पहाटेचा शपथविधी शरद पवार यांना विचारून झाला असा दावा फडणवीस यांनी केला आहे, यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

पहाटेचा शपथविधी | पवारांना विचारुन सरकार स्थापन केलं असतं तर सरकार पडलं नसतं, पाहा कुणी केला दावा
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

अहमदनगरः देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पहाटेच्या शपथविधीवरून राज्याच्या राजकारणात विविध वक्तव्यांच्या लाटा येत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या गौप्यस्फोटांवर संजय राऊतांनी (Sanjay Raut) सडेतोड उत्तरं दिली. त्या दिवशी नेमकं काय झालं होतं, हे रहस्य फडणवीस कधीही सांगू शकणार नाहीत, असा दावा संजय राऊत यांनी केला. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आज यासंदर्भाने मोठं वक्तव्य केलंय. देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याला अगदी विरोधी असं हे स्टेटमेंट आहे. तो शपथविधी जर शरद पवार यांना विचारून झाला असता तर सरकार पडलं नसतं, असं वक्तव्य थोरात यांनी केलंय.

काय म्हणाले बाळासाहेब थोरात?

पहाटेच्या शपथविधीवरून बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘ पहाटेचा शपथविधी शरद पवार यांना विचारून झाला असा दावा फडणवीस यांनी केला आहे. ते शरद पवार आहेत. त्यांना विचारून शपथविधी झाला असता तर ते सरकार पडलं नसतं. माझं पक्कं मत आहे की, ते पवार यांना विचारून झालं नाही. काही तरी वाद निर्माण करण्याचं काम सुरू आहे. विकासाच्या मुद्द्याकडे लक्ष न देता वाद करण्याचं काम सुरू आहे. ते फडणवीस करत आहेत. हा दिशाभूल सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

शरद पवार यांच्याच परवानगीने पहाटेचा शपथविधी झाला, हे देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य संजय राऊत यांनीही खोडून काढलंय. या पाठीमागे शरद पवार असते तर त्यांनी हे सरकार कोसळू दिलं नसतं. शरद पवार हे कायमस्वरुपी, स्थिर सरकार देण्यावर भर देतात. त्या काळात मीसुद्धा शरद पवार यांच्या सतत संपर्कात होतो. तेव्हा जे काय घडलं, ते देवेंद्र फडणवीस कधीही उघड करू शकणार नाहीत,असं वक्तव्य राऊत यांनी केलंय.

भीमाशंकर ज्योतिर्लिंग आसामममध्ये?

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग आसाममध्ये असल्याचा दावा केला आहे. त्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात टीकेची झोड उठवली आहे. उद्योग आणि रोजगारांप्रमाणे महाराष्ट्राचं सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभव इतर राज्यात पळवून नेलं जातंय, असा आरोप केला जातोय.

यावरून बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘ भीमाशंकराची बांधणी पाहिली तर ते बारा ज्योतिंर्लिंगापैकी एक आहे. महाराष्ट्रातून काय काय पळवून न्यायचं असंच सुरू आहे. ज्यांनी उत्तर द्यायचं ते उत्तर देत नाही.

‘मी नाराज नव्हतोच’

बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेय यांच्यातील वादावरूनही थोरात यांनी प्रतिक्रिया दिली. मी मी तर नाराजी व्यक्त केली नाही. पत्र व्यवहार तर सर्व संघटनेत चालतं. आम्हीसुद्धा तसा पत्रव्यवहार केल्याचं स्पष्टीकरण बाळासाहेब थोरात यांनी दिलंय.