मुंबई : “महाविकास आघाडी सरकार टिकणार आणि आपला पाच वर्ष कार्यकाळ पूर्ण करणार” असा दावा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला. “सरकार जास्त काळ टिकणार नाही, अशी भविष्यवाणी हे कशाच्या आधारे करतात, हेच मला समजत नाही” असा टोला थोरातांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला. (Balasaheb Thorat taunts Raj Thackeray prediction about Mahavikas Aghadi)
“हे भविष्यवाणी कशावर आणि कशाच्या आधारे करतात हे मला काही समजलेलं नाही. फार कमी कालखंड आम्हाला मिळाला आहे. त्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही आघाडी सरकारचं काम पाहिलं, तर ते निश्चितच चांगलं आहे. कामांची यादी पाहिली तर खूप मोठी आहे आणि किमान समान कार्यक्रम आम्ही राबवत आहोत” असे थोरात म्हणाले.
“मला माहिती नाही ते सरकार टिकणार नाही हे कशाच्या आधारावर म्हणत आहेत, पण मी सांगतो हे सरकार टिकणार आणि आपला पाच वर्ष कार्यकाळ पूर्ण करणार आणि 100% चांगलं काम करणार” असा विश्वासही बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
“हे सरकार जास्त काळ टिकणार नाही हे मी आधीच सांगितलं होतं आताही सांगतोय हे सरकार जास्त काळ टिकणार नाही” असे राज ठाकरे म्हणाले होते.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
दरम्यान, “हे लिव्ह इन रिलेशनशिपचं सरकार आहे. आम्ही पाडायची गरज नाही स्वतःहून पडेल” या विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावरही बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“भारतीय माणसाला आणि विशेषतः मराठी माणसाला लिव्ह इन रिलेशन काय असतं, हे माहितीही नाही. यांच्या मनात हे विचार येतातच कसे? हे कोणत्या संस्कृतीचं प्रतिनिधित्व करतात हा प्रश्न आहे. हा भारतीय संस्कृतीतला शब्द नाही. त्यांनी माहिती घ्यावी आणि याबाबतीत आत्मचिंतन करावं” असा सल्ला थोरातांनी दिला. (Balasaheb Thorat taunts Raj Thackeray prediction about Mahavikas Aghadi)