मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याचं उत्तर मिळालं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड जवळपास निश्चित मानलं जात आहे. याबाबत लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. बाळासाहेब थोरात AICC सदस्य आहेत. बाळासाहेब थोरात हे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. यंदाची त्यांची 6 वी टर्म आहे.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेसच्या दिग्गजांनी राजीनामे दिले आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिला आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही लोकसभा पराभवानंतर राजीनामा सोपवला. त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला असून, त्यांच्या जागी आता बाळासाहेब थोरात यांची वर्णी जवळपास निश्चित मानली जात आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर, विधानसभेतील महत्त्वाच्या पदांबाबत महाराष्ट्र काँग्रेसने फेररचना केली आहे. विधीमंडळ नेतेपदी राधाकृष्ण विखे पाटील यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे, तर विधानसभा नेतेपदी विदर्भातील काँग्रेसचे मोठे नेते विजय वडेट्टीवर यांची वर्णी लागली आहे. वडेट्टीवार यांनाच विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद देण्यात आलं आहे.
बाळासाहेब थोरात हे अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. म्हणजे, राधाकृष्ण विखे पाटील यांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. शिवाय, थोरात हे गांधी कुटुंबीयांचे निष्ठावंत आणि निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे थोरातांना संधी दिल्याने काँग्रेसची आगामी वाटचाल कुणाच्या नेतृत्त्वात असेल, हेही जवळपास स्पष्ट करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी संगमनेरमध्ये सभा घेतल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी थोरातांच्या निवासस्थानी मुक्कामही केला होता. शिवाय एकत्र प्रवास केला होता. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांच्यावर विधानसभेपूर्वी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देणार असल्याची चर्चा होती.
काँग्रेसच्या नवीन नियुक्त्या :
संबंधित बातम्या
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी थोरात आणि विरोधी पक्षनेते पदी पृथ्वीराज चव्हाण?
विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी बाळासाहेब थोरात आघाडीवर
राहुल गांधींकडून बाळासाहेब थोरातांना बळ देण्याचा प्रयत्न