मुंबई : बालभारतीच्या दुसरीच्या गणिताच्या पुस्तकावरुन राज्यभर वादंग उठला आहे. बालभारती पुस्तकातील अंकवाचनातील बदलामुळे सरकारवर टीका होत आहेत. एकवीसऐवजी वीस एक, एकसष्ठऐवजी 60 एक अशी नवी पद्धती अवलंबण्यात येणार आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सरकारला प्रश्न विचारला. अजित पवारांनी विधानसभेत एक मोबाईलनंबर वाचला. ते म्हणाले, “98220 अशी मोबाईल नंबरची सुरुवात असेल, तर तो नंबर नव्वद आठ असा सांगितला तर लिहिणारा 908 असं लिहील. त्यामुळे सगळा गोंधळात गोंधळ आहे”
यावेळी अजित पवारांनी बालभारती वादावरुन सरकारवर हल्ला चढवला. “मोदीसाहेबांच्या नावावर निवडून येताहेत, डोकीच चालवत नाहीत. आपल्याला एकवीस, बावीस, त्र्यानव, चौऱ्यान्नव असं शिकवलं आहे, मग तुम्ही हे काय काढलं आहे? तुम्ही सगळे सीनियर मंत्री आहात, याबाबत कुणीतरी सिरीयस घ्या”, असं अजित पवार म्हणाले.
फडणवीस, बावनकुळे कसं लिहायचं?
दरम्यान, बालभारतीच्या या नव्या प्रयोगामुळे सोशल मीडियावर वेगवेगळे मेसेज फिरत आहेत. बालभारती जर एकवीसला वीस एक, बावन्नला पन्नास दोन म्हणायला सांगत असेल, तर फडणवीस, बावनकुळे ही आडनावेही तशीच म्हणायची का असा विनोद सोशल मीडियावर फिरत आहे.
इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांना अंकवाचनाची शिकवलेली नवीन पद्धत अजब आहे!जोडाक्षर कठीण असल्याचं सांगत असं करणं म्हणजे यात विद्यार्थ्यांचंच नुकसान होणार आहे. सरकारनं गांभीर्यानं याकडे पाहिलं पाहिजे आणि ताबडतोब ही नवी पद्धत थांबवली पाहिजे.#MonsoonSession pic.twitter.com/IxbfW5Wlg6
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) June 19, 2019
बालभारतीचा नेमका वाद काय?
बालभारतीने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून गणिताच्या अभ्यासक्रमातील संख्या वाचनात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. या बदलानुसार विद्यार्थ्यांना एकवीसऐवजी वीस एक, त्र्याहत्तरऐवजी सत्तर तीन, त्र्याण्णवऐवजी नव्वद तीन अशा नव्या पद्धतीने संख्यावाचन करावे लागणार आहे. नुकतंच बालभारतीद्वारे इयत्ता दुसरीचा अभ्यासक्रमात हा महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना गणित विषयाचा अभ्यास करणं सोपे जाईल अशी आशा बालभारतीला आहे.
संबंधित बातम्या
बालभारतीचे भलते प्रयोग, ‘एकवीस’ऐवजी ‘वीस एक’
बालभारती वाद : जे शिक्षण आमदाराच्या मुलाला, तेच गरिबाच्या पोराला हवं : बच्चू कडू