ठाणे: राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची सध्या भारत जोडो यात्रा सुरू आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी महागड्या ब्रॅन्डचा टी शर्ट घातला. ज्या टी शर्टची किंमत 41 हजार होती असा दावा भाजपाकडून (BJP) करण्यात आला आहे. यावरून भाजपच्या काही नेत्यांनी राहुल गांधी यांना ट्रोल देखील केले. मात्र हाच मुद्दा पकडत आता काँग्रेसकडून (Congress) देखील भाजपावर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. काँग्रेसच्या वतीने कल्याणमध्ये भाजपाच्या विरोधात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरमधून भाजपाला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
काँग्रेसकडून भाजपाविरोधात कल्याणमध्ये जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. मोदींचा दहा लाखांचा सूट चालतो, अनुराग ठाकुर यांच्या मुलाचा बरबरीचा टी शर्ट चालतो, मग राहुल गांधींचा टी शर्ट डोळ्यात का खूपतो? असा सवाल भाजपाला करण्यात आला आहे.
पुढे या बॅनरमध्ये म्हटले आहे की, वाढती महागाई, बेरोजगारी, वाढणारे पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर, महिलांची असुरक्षिता, शेतकऱ्यांचे प्रश्न, कोलमडलेली अर्थव्यवस्था असे अनेक मोठे प्रश्न देशासमोर सध्या आहेत. असे अनेक प्रश्न असताना जनतेची दिशाभूल करणाऱ्या केंद्र सरकाराचा जाहीर निषेध. आता या टीकेला भाजपकडून काय प्रत्युत्तर मिळणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी हजारो रुपये किंमत असलेला टी शर्ट घातल्याचा दावा भाजपाच्या वतीने करण्यात आला. या टी शर्टवरून राहुल गांधी यांना चांगलेच ट्रोल करण्यात आले. मात्र त्यानंतर आता काँग्रेसने देखील भाजपाच्या नेत्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.