ठाणे : ठाण्यामधून (Thane) मोठी बातमी समोर येत आहे. ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. कही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या ठाणे महापालिकेतील जवळपास सर्वच माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. ठाण्यात एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व आहे. मात्र आता त्याच ठाण्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या समर्थनार्थ जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांचे बॅनर लागले आहेत. महाराष्ट्र योद्धा असा या बॅनरवर उद्धव ठाकरे यांचा उल्लेख करण्यात आला आहे. हे बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत.
एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ बॅनरल लावण्यात आले आहेत. या बॅनरवर उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्र योद्धा असा उल्लेख करण्यात आला आहे. ‘ न झुकणारा न वाकणारा दिल्लीश्वरांच्या अन्यायी महाशक्तिला महाराष्ट्राच्या स्वाभिमानी वृत्तीने आव्हान देणारा बाळासाहेबांच्या संघर्षमय विचाराराच खरा वारसदार उद्धव ठाकरे’ असा या बॅनरवर मजकूर छापण्यात आला आहे. या बॅनरवरून ठाण्यात एकप्रकारे उद्धव ठाकरे यांचं समर्थन वाढत असल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान एकीकडे ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ बॅनर लागले आहेत. मात्र दुसरीकडे डोंबिवलीत ठाकरे गट आणि शिंदे गटातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. शिंदे गटाने डोंबिवलीतील मध्यवर्ती शाखा ताब्यात घेतली आहे. यावरून ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने आल्यानं परिसरात तणावाचे वातावरण आहे. घटनेची महािती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. कही महिला पदाधिकाऱ्यांना ताब्यात देखील घेण्यात आलं आहे.