महेंद्रकुमार मुधोळकर, बीडः आष्टी ते नगर दरम्यान आज पहिल्यांदा रेल्वे (Railway) धावत आहे. स्वातंत्र्यापासून प्रतीक्षेत असलेल्या बीडकरांसाठी आज खरं तर मोठा आनंदाचा दिवस आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे (Pritam Munde), रावसाहेब दानवे सगळी मंडळी जमलीत. पण नेहमीच राजकारणात परस्पर विरोधी भूमिका घेणारे मुंडे भाऊ-बहिणीत आजच्या दिवशीही वाद दिसून आला.
महाविकास आघाडी सरकारने तीन वर्ष निधी देण्यास टाळाटाळ केल्यामुळे या प्रकल्पाला उशीर झाल्याचा आरोप खासदार प्रीतम मुंडेंनी केला. तर धनंजय मुंडे यांनीही मविआ सरकारने या प्रकल्पाला कशी गती दिली, याचं स्पष्टीकरण देण्यासाठी एक ट्विटची मालिकाच सादर केली..
प्रीतम मुंडे आज या उद्घाटन कार्यक्रमापूर्वी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, सध्या आष्टीपासून ही रेल्वे धावतेय, मात्र बीडपासून रेल्वे धावेल, तेव्हा खरी स्वप्नपूर्ती होईल. दुर्दैवाने महाविकास आघाडीने या प्रकल्पाचे सुमारे पावणे चारशे कोटी रुपये तीन वर्षे थकवल्यामुळे या प्रकल्पाला म्हणावी तशी गती घेता आली नाही….असं प्रीतम मुंडे म्हणाल्या.
पण सरकार बदल झाल्याने लगेच सरकारने वाढीव निधीस मंजूरी देऊन तत्काळ २४२ कोटी रुपये या प्रकल्पासाठी वर्ग केले आहेत. त्यामुळेच आज आष्टी ते नगर या रेल्वेमार्गाचं उद्घाटन होऊ शकलं, असं वक्तव्य प्रीतम मुंडे यांनी केलंय.
प्रीतम मुंडेंच्या या आरोपाला प्रत्युत्तर देताना धनंजय मुंडे यांनी काही ट्विट केलेत.
स्व. विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री असताना या प्रकल्पासाठी त्यांनी अर्धा खर्च राज्य आणि अर्धा खर्च केंद्र उललेल, असा निर्णय घेतल्यानेच हा प्रकल्प वेगवान झाल्याचं त्यांनी म्हटलंय.
तर पुढील एका ट्विटमध्ये, मविआ सरकारने या प्रकल्पाच्या कामाला वेळोवेळी ठरल्याप्रमाणे निधी उपलब्ध करून दिला. केंद्राच्या सुधारीत आराखड्याच्या समप्रमाणात या प्रकल्पाचा खर्च देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या अखेरच्या मंत्रिमंडळ बैठकीत गेण्यात आला होता.. असंही त्यांनी स्पष्ट केलं.
एकूणच बीडकरांसाठी खरं तर अत्यानंदाच्या दिवशीही आज नेहमीप्रमाणेच भावा-बहिणींमध्ये आरोप-प्रत्यारोप दिसून आले.
माझ्यासह सबंध बीड जिल्हा वासीयांच्या जिव्हाळ्याची नगर-बीड-परळी रेल्वे आजपासून आष्टीपर्यंत धावणार,याचा जिल्ह्याचा एक नागरिक म्हणून मनस्वी आनंद आहे.यासाठी योगदान देणारे
स्व.गोपीनाथराव मुंडे साहेब, स्व.विलासराव देशमुख साहेब, बीड रेल्वे कृती समितीचे सर्व सदस्य यांचे स्मरण होते. (1/6) pic.twitter.com/tNdDrtYcRK— Dhananjay Munde (@dhananjay_munde) September 23, 2022