बीडः डोळ्यासमोर सतत दुष्काळ, ग्रामस्थांचे हाल पाहतानाच तिनं एक स्वप्न पाहिलं. माझ्या गावात हरितक्रांती आणेन. ध्येय गाठण्यासाठी बारामतीत कृषी विषयात शिक्षणही सुरु केलं. आपली कन्या गावाच्या हितासाठी एवढा विचार करतेय, धडपड करतेय, हे पाहून गावकऱ्यांनी ग्राम पंचायतीनी निवडणूक (Gram Panchayat Election) लढवण्याचा आग्रह धरला. पाहता पाहता गावानं मागणी उचलून धरली अन् 21 व्या वर्षीच भारती बाळासाहेब मिसाळ (Bharati Misal) सरपंच (SarPanch) झाली.
ही कहाणी आहे बीडच्या आष्टी तालुक्यातील हातोळन गावातल्या तरुणीची. किंबहुना असं म्हणता येईल, या तरुणीच्या धडपडीची कथा आताकुठे सुरु झाली आहे. आता सरपंच पदाची माळ गळ्यात पडल्यानंतर गावाचं नाव जगाच्या नकाशात ओळखलं जाईल, यासाठी ती झटणार आहे. भारती बाळासाहेब मिसाळ ही राज्यातली सर्वात लहान महिला सरपंच असल्याचा दावा करण्यात येतोय.
बीड- अहमदनगर सीमेवर असलेल्या बीडच्या आष्टी तालुक्यातील हातोळन- औरंगपूर ही गटग्रामपंचायत आहे. हातोळन गावातच भारती हिचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले.
वडील बाळासाहेब हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यामुळे घरात सतत परिवर्तनवादी विचार नांदत असायचे. वडिलांचा प्रभाव भारती हिच्यावर पडला. गावात कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ यामुळे शेतकरी सतत कर्जाच्या ओझ्याखाली दबून असायचे.
शेतकऱ्यांच्या हाल अपेष्टा उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या भारतीने माध्यमिक शिक्षण पूर्ण करून कृषी शिक्षण घेऊन गावात हरित क्रांती आणण्याचे स्वप्न पाहिले. बारामती येथील डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच गावाकडे ग्रामपंचायत निवडणूक लागली.
मतदार यादीत तिचे पहिल्यांदाच नाव आले होते. गावच्या लेकीची धडपड पाहून ग्रामस्थांनी बैठक घेऊन भारतीच्या वाडीलांकडे निवडणूक संदर्भात प्रस्ताव मांडण्यात आला.
सर्व ग्रामस्थांनी निर्णय घेतल्यानंतर भारतीला निवडणूक रिंगणात उभे केले. प्रचार देखील दमदार झाला. पॅनलचे नाव परिवर्तन पॅनल देण्यात आले.
कसलाही अनपेक्षित खर्च न करता भारतीला ग्रामस्थांनी मोठ्या मताधिक्याने निवडून आणले. आज संपूर्ण गावाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. पहिल्यांदाच मतदान आणि थेट सरपंच झाल्याने पोरीचं नशीब उजळलं अशी चर्चा ग्रामस्थांत होत आहे.
भारती मिसाळ हिचे पाहिल्यांदाच मतदार यादीत नाव आले. पाहिल्यांदाच मतदान करण्याची ओढ वेगळीच होती. मात्र याच मतातून स्वतः सरपंच होईल याची पुसटशीही कल्पना भारतीला नव्हती. गाव हिरवंगार करणं आणि महिलांना स्वावलंबी बनवण्याचा तिचा मानस आहे.