महेंद्रकुमार मुधोळकर, बीडः मराठा आरक्षणाबाबत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्यानं राजकारण चांगलंच पेटलंय. बीडचे माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी तानाजी सावंतांवर घणाघाती टीका केली आहे. लोकशाहीत बोलताना सरकारच्या मंत्र्यांनी भान ठेवून बोलावं, असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलंय. मराठा आरक्षणावरून विरोधकांनी जी टीका चालवलीय, त्याला उत्तर देताना तानाजी सावंतांनी काल उस्मानाबादेत काल एक वक्तव्य केलंय. सत्तांतर झाल्यानंतर विरोधकांना मराठा आरक्षणाची खाज सुटल्याचं वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं. त्यावर धनंजय मुंडेंनी जोरदार टीप्पणी केली.
काय म्हणाले धनंजय मुंडे?
तानाजी सावंतांवर टीका करताना धनंजय मुंडे म्हणाले, ‘ मंत्रिपदावर आल्यावर मराठा आरक्षणाच्या बाबतीत मंत्री तानाजी सावंत बोलले. पण त्यांचं हे वक्तव्य मंत्रिपद कायमचं काढून घेऊ शकतं, हे मात्र नक्की आहे. सत्तेत आलं की मराठा क्रांती मोर्चाबद्दल बोलायचं, त्यांचा अपमान करायचा हे चालणार नाही, असं धनंजय मुंडे यांनी सुनावलं.
तसेच राजकारणात कुणीही ताम्रपट घेऊन जन्माला आलं नाही, याचं भान त्यांनी बोलताना ठेवावं, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली.
दोन दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्यार तानाजी सावंत यांनीही धनंजय मुंडेंवर जहरी टीका केली होती. आमच्यावर शिंतोडे टाकण्याचा प्रयत्न केला त्याला नागडा करून मारू, असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी बीडमध्ये केलं होतं.
बीडमधील आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. ते म्हणाले, तेव्हाचा बीड जिल्ह्यातील एक मंत्री आमच्या मुख्यमंत्र्यांबद्दल टूरटूर करत होता… असं म्हणत सावंत यांनी धनंजय मुंडे यांचं नाव न घेता ईशारा दिला होता.