Sharad Pawar : एकीकडे म्हणायचं धनगरांना आरक्षण द्या अन् दुसरीकडे; गोपीचंद पडळकरांचा शरद पवारांवर पुन्हा निशाणा

| Updated on: Oct 12, 2023 | 3:09 PM

BJP MLA Gopichand Padalkar on Sharad Pawar : आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा साधला आहे. धनगर आरक्षणावरून त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. तसंच माझ्यावर कधीही हल्ला होऊ शकतो, असं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत. वाचा सविस्तर...

Sharad Pawar : एकीकडे म्हणायचं धनगरांना आरक्षण द्या अन् दुसरीकडे; गोपीचंद पडळकरांचा शरद पवारांवर पुन्हा निशाणा
Follow us on

सागर सुरवसे, प्रतिनिधी- बीड | 12 ऑक्टोबर 2023 : भाजप आमदार गोपीचंद पडळकर वारंवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना दिसतात. आताही धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून पडळकरानी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. लेक आणि नातू म्हणतो, धनगर समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. तर आजोबा आदिवासी समाजात जाऊन म्हणतो, आदिवासींच्या आरक्षणात कुणाला घुसू देणार नाही. हे विरोधाभासी आहे, असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा साधला आहे.  गोपीचंद पडळकर सध्या बीडमध्ये बोलत आहेत. तिथे त्यांनी पवारांवर टीका केलीय.

माझ्यावर कधीही हल्ला होऊ शकतो. कारण धनगर समाज उठला तर राजकारण करणं अवघड आहे. त्यामुळे गोपीचंदला संपवला पाहिजे, अशी लोकांची धारणा आहे. म्हणून मला संपवलं जाऊ शकतं. मात्र तरीही जीव गेला तरी बेहत्तर पण धनगर समाजाने एक झालं पाहिजे. सगळ्या बहुजन समाजाला एकत्र करण्याचं काम भंडारा करतो. त्यामुळे आपण एकत्र आलं पाहिजे, असं गोपीचंद पडळकर म्हणालेत.

चौंडीमध्ये 2006 सालपासून मी तिथं जातो. मात्र आम्हाला कुणीही अडवलं नाही. लबाड लंडग्याचं लबाड पिल्लू तिथे आमदार झाले आणि तिथं राजकारण आलं. माझ्या नातवाच्या मतदारसंघात अहिल्यादेवींचे जन्मस्थान आहे, असं पवार म्हणाले. त्या लंडग्याला पळवून लावण्याचं काम तिथे केले गेलं, असं म्हणत गोपीचंद पडळकरांनी टीका केली आहे.

मागासवर्गीय बहिणींच्या अंगावर हात घातला. म्हणून बापू बिरू वाटेगावकरांना हातात कुऱ्हाड घ्यावी लागली. त्यामुळे आपण कोणावर अन्याय करायचा नाही. मी सांगतो त्याप्रमाणे चला… बघा तुम्हाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. सरकार पण म्हणतंय की, राज्यात धनगड कोणीही नाही. त्यामुळे धनगर समाजाला आरक्षण मिळेल, असंही पडळकरांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात मी घोंगडी बैठक घ्यायला सुरुवात केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळायला लागला. म्हणून आपल्याच समाजातील युवकाला हाताशी धरून माझ्या गाडीवर हल्ला केला गेला. माझ्यावर आताही हल्ला होऊ शकतो पण मी त्याला घाबरत नाही. कारण मी आधी धनगर आहे आणि नंतर आमदार गोपीचंद पडळकर आहे. आधी समाज आहे आणि नंतर पक्ष आहे. यापुढे अहिल्यादेवी यांच्यासोबत घरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावा. कारण बाबासाहेबांनी सांगितलं की, जो समाज आपली ओळख विसरतो तो नव्याने इतिहास घडवू शकत नाही, असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी आपला निर्धार बोलून दाखवला.