महेंद्र मुधोळकर प्रतिनीधी टीव्ही9 मराठी बीड : दसरा मेळावा (Dussehra Gathering) म्हटलं की शिवसेना की शिंदे गट हाच मुद्दा समोर येत होता. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हा वाद काही प्रमाणात मिटला आहे. मात्र, दसरा काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच बीड जिल्ह्यामध्ये (Beed District) नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. दसऱ्याला मेळावा हा पंकजा मुंडे (Pankja Munde) यांचाच होत असत. पण यंदा प्रथमच भगवान गडाच्या पायथ्याशी मेळावा होणार आहे. भगवान गड कृती समितीने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकाच दिवशी एकाच जिल्ह्यामध्ये दोन मेळावे म्हणले तर वंजारा समाजाने नेमके कुठे जायचे हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे भगवान गडावर श्रद्धा असूनही पंकजा मुंडे यांना सावरगाव येथे मेळावा घ्यावा लागत आहे. आता कृती समितीच्या माध्यमातून मेळाव्याचे आयोजन केले गेल्याचे सांगितले जात आहे.
ज्याप्रमाणे शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होतो त्याच प्रमाणे पंकजा मुंडे देखील बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सावरगाव येथे दसरा मेळावा घेत असतात. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांनी ही परंपरा कायम ठेवली आहे. सावरगावातून जनतेला आणि मतदारांना एक संदेश दिला जातो.
यंदा मात्र दसरा मेळाव्यावरुन दोन गट आमने-सामने आले आहेत. भगवान गड दसरा मेळावा कृती समितीने भगवान गडाच्या पायथ्याशी मेळावा घेण्यावर ठाम झाले आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या सावरगाव बीड जिल्हा येथे होणाऱ्या भगवान भक्ती गडावर होणाऱ्या मेळाव्यावर विघ्न पडण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत सावरगाव येथील मेळाव्यात राज्यभराच्या कानाकोपऱ्यातून नागरिक दाखल होत असत. शिवाय एकच मेळावा असल्याने जनतेची द्वीधा मनस्थिती होत नव्हती. पण आता अनेकांच्या श्रद्धेचे ठिकाण असलेल्या भगवानगडावरही मेळावा होत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम पंकजा मुंडेच्या मेळाव्यावर काय होणार हे पहावे लागणार आहे.
भगवान गडावरील कृती समितीने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कोणाच्याही मेळाव्याला विरोध नाही मात्र. भगवान गडाची खंडित झालेली परंपरा पुढे नेण्यासाठी हा मेळावा असल्याची माहिती कृती समितीने दिली आहे. असे असले तरी दोन मेळावे होत असल्याने नवीन वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.