बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी काही वेळा आधी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. आज भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा स्मृतीदिन आहे. यावर पंकजा मुंडे बोलल्या आहेत. गोपीनाथ मुंडे यांचं वादळी जीवन राहिलं आहे. मी वादळाची लेक आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. पंकजा मुंडे यांनी काही वेळाआधी गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केलं.
पंकजा मुंडे आज तीन वाजता भाषण करणार आहेत. तेव्हा या भाषणात काय बोलणार? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. तेव्हा मलाच माहिती नाही मी नक्की काय बोलणार आहे. माझ्या हातात कधीही कागद नसतो. कधी कोणती चिठ्ठी नसते. माझं भाषण लोकांना संबोधून असतं. त्यामुळे मी जे काही बोलेन ते तीन वाजता लोकांना ऐकायला मिळणार आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
लोक गोपीनाथ मुंडे यांना मानतात. त्यांच्या दर्शनाला येतात. लोकांना त्यांचं दर्शन घेऊन उर्जा मिळत असेल. तर ती चांगली गोष्ट आहे, असं त्या म्हणाल्या आहेत.
आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत भावनिक असतो. यादिवशी मला राजकारण वगैरे काहीही दिसत नाही. राजकारण शून्य दिसतं. आज जे लोक आलेत. त्यांना मी काहीही दिलेलं नाही. तरी ते साहेबांवरच्या प्रेमापोटी आलेले आहेत. एकनाथ खडसे आलेत. ते बाबांचे सहकारी होते. तेही त्यांच्यावरील प्रेमापोटी आले आले आहेत, असं पंकजा म्हणाल्यात.
विनोद तावडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली असता. तावडे आमचे महामंत्री आहेत. ते बोलले असतील तर त्यावर मी काय बोलणार? नाथाभाऊ काय म्हणाले, तावडे काय म्हणाले, याचं उत्तर पंकजा मुंडे काय उत्तर देणार, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
पंकजा मुंडे यांनी आज एक व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. माझं भाग्य आहे की माझा जन्म त्यांच्या पोटी झाला. त्याहूनही मला माझं भाग्य वाटतं ते म्हणजे त्यांच्या संघर्षाचा वारसा मला मिळाला. स्वाभिमानाने संघर्ष करत मुंडेसाहेब लढले. तसंच मीदेखील लढत राहील हे मी माझं कर्तव्य समजते. तेमी शेवटच्या श्वासापर्यंत पूर्ण करत राहील, असं पंकजा मुंडे या व्हीडिओमध्ये म्हणाल्या आहे.
आठवण साहेबांची !!#GopinathGad pic.twitter.com/EcLq46HmJG
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) June 2, 2023