संभाजी मुंडे, परळीः बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या गाडीला अपघात (Car Accident) झाल्याची माहिती समोर आली आहे. काल रात्री परळीत ही घटना घडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या अपघातात धनंजय मुंडे यांच्या छातीला मार लागला आहे. सध्या त्यांची प्रकृती ठीक असली तरीही त्यांना मुंबईत पुढील उपचारासाठी पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
अपघाताबद्दल अधिक माहिती अशी की, काल परळीतील आझाद चौकात रात्रीच्या वेळी ही घटना घडली. रात्री सुमारे पावणे तीन वाजेच्या सुमारास धनंजय मुंडे यांच्या कारला अपघात झाला. यावेळी धनंजय मुंडे स्वतः गाडी चालवत होते.
अपघात नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. धनंजय मुंडे यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरु केले. मात्र त्यांच्या छातीला मार लागली आहे. त्यामुळे पुढील उपचारांसाठी त्यांना मुंबईला हलवण्यात येणार आहे.
त्यांच्या छातीला मार लागल्याची माहिती डॉक्टरांनी टीव्ही9 ला दिली आहे. पुढील उपचारांसाठी धनंजय मुंडे यांना मुंबईत हलवणार आहेत.
धनंजय मुंडे यांना परळीतून लातूर येथे नेलं जाईल. त्यानंतर विशेष विमानाने त्यांना मुंबईत पुढील उपचारांसाठी हलवलं जाईल, अशी माहिती खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी टीव्ही 9 ला दिली आहे.
काल दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतताना रात्री12.30 वाजण्याच्या सुमारास@dhananjay_munde साहेबांच्या वाहनास परळी शहरात वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला आहे.साहेबांच्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे
— OfficeofDM (@OfficeofDM) January 4, 2023
धनंजय मुंडे यांच्या गाडीला रात्री तीन वाजेच्या सुमारास अपघात झाला, मात्र याची माहिती आज सकाळपर्यंत फारशी कुणाला नव्हती. आज सकाळी अपघाताची बातमी शहरभर पसरली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे.
धनंजय मुंडे लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
मराठवाड्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रिय अन् तरुण नेते म्हणून धनंजय मुंडे यांची ओळख आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांचे ते पुतणे आहेत. तर सध्या भाजपातील नेत्या पंकजा मुंडे यांचे ते चुलत भाऊ आहेत.