बीडहून संभाजी मुंडे आणि मुंबईहून सागर जोशीसह, ब्युरो रिपोर्ट, टीव्ही 9 मराठी, मुंबई : भाजप राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे (Pankaja Munde) या नाराज असल्याच्या राजकीय चर्चांना उधाण आलंय. तशी कुजबूज (Pankaja Munde upset News) पुन्हा राजकीय वर्तुळात सुरु झालीय. ज्या वक्तव्यामुळे ही कुजबूज सुरु झाली, त्या वक्तव्याच्या अलिकडे आणि पलिकडेही पंकजा मुंडे यांनी बरंच काही म्हटलं होतं. पंकजा मुंडे यंनी केलेलं ते वक्तव्य होतं, बीडमधीलच (Beed Politics) एका कार्यक्रमातलं.
भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांनी बीडमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. 26 सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम पार पडला होता. पंकजा मुंडे या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक या नात्याने उपस्थितांशी व्यासपीठावरुन बोलल्या होत्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त समाजातील बुद्धिजीवी लोकांशी संवाद, असा असं या कार्यक्रमाचं नाव होतं. या भाषणातील पंकजा मुंडे यांच्या त्या 22 मिनिटांच्या भाषणातील शब्द न् शब्द काय होता, हे जाणून घेणार आहोत.
मोदींजींच्या वाढदिवसानिमित्त 17sepपासून विविध कार्यक्रम केले,त्यात बुद्धिजीवी संमेलन मधील माझ्या भाषणाच्या highlights.आपल्या पर्यंत एक ओळ आलीच आहे,”सनसनीखेज” बातम्यातून जमले तर हेही पहा,मतितार्थ लक्षात येईल.पूर्ण भाषण ऐकावे वाटल्यास या linkवर आहेच.धन्यवाद.https://t.co/vvgRC0poti
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) September 27, 2022
काही मुलं अशी होती इथे, ज्यांची आर्थिक परिस्थिती फार खास नाही. काही मुलं अशी आहेत इथे, ज्यांना आवडीच्या रंगाचा टेबल मिळत नाही, रुममध्ये एसी नाही, रोज आई बदाम, पिस्ता घालून रात्री दूध देत असेल. पण काही मुलांच्या आयुष्यात हे नव्हतं.
मी त्यांच्या सायकोलॉजीचा विचार करते जीवनामध्ये. ते कसे पुढे जातात. असाच एक मुलगा या देशाला लाभला पंतप्रधान म्हणून ज्याला गणवेश घ्यायला पैसे नव्हते. ज्याच्याकडे शाळेत जायला पैसे नव्हते.
ज्याचे वडील रेल्वे स्टेशनवर चहा विकायचे आणि आई चुलीसमोर धुरात स्वयंपाक करत होती. तो देशाचा प्रधानमंत्री बनला. महत्वाकांक्षा हा शब्द मला आवडत नाही. पण मोठी, दीव्य स्वप्न पाहायला काही हरकत नाही. त्यात काही कमी जास्ती झालं तरी आपण तिथे पोहोचतोच.
मी मोदीजींकडे पाहते. एक मिनिट या व्यक्तीला आराम करायला वेळ नाही. सकाळी चारला उठतात, योगा करतात. जागतिक महासत्ता बनण्याचं स्वप्न आहे.
जीवनात पहिल्यांदा आमदार झाले आणि मुख्यमंत्री झाले. पहिल्यांदा जीवनात खासदार झाले आणि प्रधानमंत्री झाले. नंतर प्रधानमंत्री झाले ते ऐतिहासिक बहुमत घेऊन आले. हे काय आहे? हे प्लॅनिंग असतं. खूप बुद्धीमान असण्याची गरज नाही. प्रयत्नात सातत्य, कष्ट आणि सकारात्मकता हे फार महत्वाचं आहे.
आपल्याला नरेंद्र मोदींसारखा एक पंतप्रधान लाभलेला आहे, ज्यांचा संपूर्ण विश्वावर एक प्रभाव पडलेला आहे. विश्वात एक वलय तयार झालं आहे आणि भारत महासत्ता बनण्याकडे वाटचाल सुरु आहे.
तर ही लोकं जेव्हा चळवळीतून घडत असतात तेव्हा ते आपल्याला काहीतरी शिकवत असतात. आता मोदींच्या कार्यक्रमानिमित्त तुम्ही इथे आला आहात. तर निवडणुकांमध्ये काही बदल करण्याचा प्रयत्न आपण करु.
ही निवडणूक टिपीकल पद्धतीने न लढता एका वेगळ्या विषयावर लढू. म्हणजे ही मुलं जी बसली आहेत, ती जात-पात, पैसा-अडका याच्या पलीकडे जातील.
मोदीजींना वंशवादाचं राजकारण संपवायचं आहे. मी पण वंशवादाचं प्रतिक आहे. मला संपवू नाही शकत कुणी. म्हणजे मोदीजींनीही ठरवलं तरी संपवू नाहीत शकणार, जर तुमच्या मनामध्ये राज्य केलं तर. तुमच्या जीवनामध्ये मी चांगलं करु शकले तर.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला राजकारणात स्वच्छता आणायची आहे. कारण राजकारणातून सर्वात महत्वाचे निर्णय होतात. या मुलांना चांगलं भविष्य दाखवण्यासाठी आपल्याला राजकारणात बदल करावे लागतील.
तुम्ही माझा सन्मान ठेवला. माझं इतकं बोलणं ऐकलं. मलाही राजकारणापलीकडे काहीतरी बोलता आलं. मी एक सांगते एक चहावाला या देशाचा प्रधानमंत्री बनू शकतो हा संकल्प मोदीजींनी केला.
त्यांनी काँग्रेसमुक्त देशाचं स्वप्न पाहिलं, कारण ते त्या प्रवृत्तीपासून देश मुक्त करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांचा तो प्रवास, त्यांचा तो प्रयास आपल्याला माहिती करुन दिला तर भविष्यात त्यातून आपण खूप काही शिकू शकतो.