बीडः शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या समर्थनार्थ बीडमध्येदेखील बॅनरबाजी करण्यात आलीय. या बॅनरवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा फोटो लावलेला नाही. बीड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी हे बॅनर्स लावण्यात आले आहेत. आम्ही भाई समर्थक असे ठळक अक्षरात या बॅनर्सवर लिहिले आहे. तसेच पोस्टर्सवर धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe), बाळासाहेब ठाकरे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे फोटो लावण्यात आले आहेत. आतापर्यंत पालघर, ठाणे, पुणे या शहरात अशा आशाचे बॅनर्स झळकत होते. मात्र आता एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बीड मध्ये हे बॅनर्स झळकत आहेत.
दरम्यान, औरंगाबादमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ भाजप कार्यकर्त्यांनी काल बॅनरबाजी केली. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठलाच्या महापूजेचा मान यंदा देवेंद्र फडणवीस यांनाच मिळावा, अशा आशयाचे बॅनर्स औरंगाबादमधील मुख्य रस्त्यावर लावण्यात आले. भाजप कार्यकर्त्यांनी यासाठी विठ्ठलाकडे साकडं घातलं.
दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या आवाहनानंतरही एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेल्या आमदारांनी उद्धव ठाकरेंना प्रतिसाद दिला नाही. उलट शिंदे गटात जाणाऱ्या आमदारांची संख्या वाढतच गेली. त्यामुळे उद्धव ठाकरे गटातील शिवसैनिक आक्रमक झाले असून अनेक ठिकाणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांविरोधात निदर्शने करण्यात येत आहेत. कोकणात आमदार सदा सरवणकरांविरोधात शिवसैनिकांनी निदर्शनं केली.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर प्रथमच उद्या मुंबईत शिवसैनिकांचा जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला आदित्य ठाकरे संबोधित करणार आहेत. युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे आपल्या भाषणातून शिवसैनिकांमध्ये उत्साह भरू शकतील का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.