पुणे : भाजप-शिवसेना (BJP-Shivsena) युतीचा आणि जागा वाटपाचा निर्णय अजून प्रलंबित आहे. त्यापूर्वीच पुण्यात शिवसेनेच्या इच्छुक उमेदवाराने प्रचाराचा नारळ फोडला आहे. शिवसेनेचे इच्छुक उमेदवार विशाल धनवडे (Shivsena Candidate Vishal Dhanvade) यांनी पुण्यातील कसबा मतदारसंघातून (Kasaba Constituency) विधानसभेसाठी निवडणूक प्रचार सुरु केला आहे. त्यामुळे जागावाटपावरुन भाजप-शिवसेना (BJP-Shivsena) युतीत ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
विशाल धनवडे यांनी ग्रामदैवत कसबा गणपतीचे दर्शन घेत आपल्या प्रचाराला सुरुवात केली. धनवडे यांनी कसबा मतदारसंघावर दावा केला आहे. गणपती बाप्पा मोरया, कसबा शिवसेनेला मिळू द्या, असं गाराणंही धनवडे यांनी गणपतीला घातलं. त्यावरुन स्पष्ट दिसत आहे की, पुण्यात शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
विशाल धनवडे यांनी युवासेना, महिला आघाडीसह प्रचाराला सुरुवात केली. शिवसेनेचा इच्छुक उमेदवार म्हणून कसबा मतदारसंघात शिवसेनेचा आमदार असावा,अशी भूमिका त्यांनी मांडली.
पुण्यातील आठही मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. त्यातच आठ जागांपैकी दोन जागा शिवसेनेला मिळणार असल्याची शक्यता आहे. मात्र हडपसर, शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट या तीन जागांवर शिवसेनेचं विशेष लक्ष आहे. या तीन जागांसाठी शहरातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. तशी आग्रही मागणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे करण्यात आली आहे.
भाजपा आठ जागांवरील दावा सोडण्यास तयार नाही. त्यामुळे हतबल झालेली शिवसेनाही आक्रमक झाली. शिवसेनेनं प्रचाराचा शुभारंभ करत भाजपवर दबाव टाकण्यास सुरुवात केलीय. नुकतेच निवृत्त पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. शिवाजीनगर मतदारसंघातून ते इच्छुक आहेत. त्याचबरोबर संजय भोसले आणि नाना भानगिर ही विधानसभेसाठी आक्रमक झाले आहेत.
पुण्यातील विद्यमान आमदार
पुणे शहरात 8 मतदारसंघ आहेत. यामध्ये कसबा पेठ, पुणे छावणी, हडपसर, पर्वती, खडकवासला, कोथरुड, शिवाजी नगर आणि वडगाव शेरी यांचा समावेश आहे.
208 – वडगाव शेरी – जगदीश मुळक (भाजप)
209 – शिवाजीनगर – विजय काळे (भाजपा)
210 – कोथरुड – मेधा कुलकर्णी (भाजप)
211 – खडकवासला – भीमराव तपकीर (भाजप)
212 – पर्वती – माधुरी मिसाळ (भाजप)
213 – हडपसर – योगेश टिळेकर (भाजप)
214 – पुणे कॅन्टोन्मेंट – दिलीप कांबळे- (भाजप)
215 – कसबा पेठ – गिरीष बापट (भाजप)