बेळगाव : हा लढा बेळगाव विरुद्ध कर्नाटक नसून महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक आहे. जे महाराष्ट्रातून आमच्या विरोधात प्रचाराला आले त्यांनी स्वतःला महाराष्ट्र द्रोही सिद्ध केलं आहे, अशा शब्दात बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत (Belgaum Bypoll) महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके (Shubham Shelke) यांनी महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला. शेळकेंनी मतदानाचा हक्क बजावला. (Belgaum Loksabha Bypoll Maharashtra Ekikaran Samiti Shubham Shelke slams Devendra Fadnavis)
“बेळगावात इतका उत्साह पहिल्यांदाच”
“मतदानाचा हक्क लोकशाहीने दिलेला आहे. त्या माध्यमातून मी मतदान केलं. माझा अनुक्रमांक 9 असल्याने ‘नव’मतदार म्हणून मी मतदान केलं. 9 शुभांक मानला तरी वावगं ठरणार नाही. मराठी माणसाने ठरवलं की आपल्या माणसाला मतदान करायचे तर आमचा विजय दूर नाही. मी लहानपणापासून या लढ्याशी जोडलो गेलो आहे. पण अलिकडच्या काळात बेळगावात इतका उत्साह पहिल्यांदाच पाहायला मिळाला” असं शुभम शेळके म्हणाले.
“महाराष्ट्रात सामील होणे हेच अंतिम ध्येय”
“आमचे अंतिम ध्येय महाराष्ट्रात सामील होणे हेच आहे. इथे मराठी माणसाची गळचेपी होते, शिवरायांचा अपमान, शिवरायांची साक्ष देणाऱ्या भगव्या झेंड्याची विटंबना, याची चीड व्यक्त करण्याचे माध्यम ही निवडणूक आहे. इथे लाल पिवळ्या झेंड्याचा वचपा काढायला मराठी माणूस ही निवडणूक संधी म्हणून पाहात आहे” असंही शेळके म्हणाले.
“त्यांनी स्वतःला महाराष्ट्रद्रोही सिद्ध केलं”
“आम्हाला अपेक्षा होती की महाराष्ट्रातून समिती विरोधात प्रचाराला कोणी येणार नाही. कारण हा लढा बेळगाव विरुद्ध कर्नाटक नसून महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक आहे. जे महाराष्ट्रातून आमच्या विरोधात प्रचाराला आले त्यांनी स्वतःला महाराष्ट्रद्रोही सिद्ध केलं आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना सुरुवातीपासून या लढ्यासाठी आग्रही आहे. काँग्रेस आणि भाजप यांना या प्रश्नाचे सोयर सुतक आहे. असं वाटत नाही. मुळात हा प्रश्न निर्माण केला काँग्रेसने आणि भाजपला या प्रश्नाशी काही देणंघेणं नाही. ज्यावेळी फडणवीस यांचे सरकार होते त्यावेळी त्यांची भेट घेण्यासाठी साडेचार वर्षे वाट पाहावी लागली. त्यामुळे आम्हाला फडणवीस यांच्याकडून अपेक्षा नाहीत, असंही शुभम शेळके यावेळी म्हणाले. (Belgaum Bypoll Shubham Shelke Devendra Fadnavis)
जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तो पर्यंत सीमावासियांवर होणारा अन्याय थांबवणे, हा मूळ उद्देश आहे. प्रश्न सुटण्यासाठी शर्थीचे प्रयत्न आणि बेळगावच्या विकासाठी मी आणि समिती कटीबद्ध राहू, अशी ग्वाही शेळकेंनी दिली.
संबंधित बातम्या :
(Belgaum Loksabha Bypoll Maharashtra Ekikaran Samiti Shubham Shelke slams Devendra Fadnavis)