बंगळुरू : कर्नाटकात सध्या विधानसभा निवडणुकीचं वारं वाहतंय. अशात सगळेच पक्ष मतदारांना वेगवेगळी आश्वासनं देत आहेत. पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध होत आहेत. अशात भाजपचाही जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे. यात त्यांनी विविध घोषणा केल्या आहेत. भाजपने दररोज अर्धा लिटर नंदिनी दूध आणि वर्षात तीनदा मोफत सिलेंडर देण्याची घोषणा केली आहे.
भाजपने आपल्या जाहीरनाम्यात अनेक घोषणा केल्या आहेत. कर्नाटकात समान नागरी संहिता लागू करण्याचे आश्वासन भाजपने दिलं आहे. भाजपने अण्णा, अक्षरा, आरोग्य, अभिवृद्धी, आद्य आणि अभया या 7 ‘अ’च्या बाबी लक्षात घेतल्या आहे. बीपीएल कार्डधारकांना तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याचं आश्वासन दिलं आहे. प्रत्येक वॉर्डात अटल आहार केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. पोषण आहार योजने अंतर्गत प्रत्येक बीपीएल कार्डधारक कुटुंबाला अर्धा लिटर नंदिनी दूध देण्याचंही आश्वासन भाजपनं दिलं आहे.
भाजपने आपल्या जाहीरनाम्यात प्रत्येक प्रभागात अटल आहार केंद्र सुरू करण्याची घोषणा केली आहे. या योजनेमुळे नागरिकांना स्वस्तात अन्न मिळणार आहे. कर्नाटकमध्ये NRC लागू करण्याचंही आश्वासन भाजपने दिलं आहे. अवैध निर्वासितांना हद्दपार करू असा शब्द भाजपने कर्नाटकच्या जनतेला दिला आहे.
BJP National President Shri @JPNadda releases BJP’s manifesto for Karnataka Assembly Election 2023. #BJPPrajaPranalike2023 https://t.co/sJmRGJpQVH
— BJP (@BJP4India) May 1, 2023
बीपीएल कुटुंबांना दररोज अर्धा लिटर नंदिनी दूध आणि दर महिन्याला पाच किलो धान्याचं किट
दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना दरवर्षी उगादी, गणेश चतुर्थी आणि दिवाळीला तीन गॅस सिलेंडर
समान नागरी संहिता लागू करण्याचं आश्वासन
वोक्कलिंगा आणि लिंगायत या समाजाला दोन टक्के आरक्षण देण्याचं आश्वासन
महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात स्वस्त, दर्जेदार आणि सकस आहार देण्यासाठी अटल आहार केंद्र
कुटुंबातील पाच महिलांसाठी प्रति वर्ष 10,000 रुपयांची एफडी करण्याचं आश्वासन
निराधारांसाठी 10 लाख घरं
ज्येष्ठ नागरिकांसाठी दरवर्षी मोफत आरोग्य तपासणी
कर्नाटकात सध्या निवडणुकीचा माहौल आहे. 10 मेला मतदान होणार आहे. अशात मतदारांना वळवण्यासाठी आश्वासनं दिली जात आहेत. भाजपने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.