शरद पवार गटाला सोलापुरात बळ मिळणार?, तरुण नेता प्रवेश करणार; भेटीगाठीत काय ठरलं?

| Updated on: Aug 24, 2024 | 7:08 PM

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे सध्या राज्यभरात फिरून पक्षाला बळकटी देण्याचं काम करत आहेत. पक्षात नव्या लोकांना प्रवेश देत असून त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी देत आहेत. लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला मोठं यश मिळाल्यानंतर अनेक नेते शरद पवार गटात येण्यास उत्सुकही आहेत.

शरद पवार गटाला सोलापुरात बळ मिळणार?, तरुण नेता प्रवेश करणार; भेटीगाठीत काय ठरलं?
sharad pawar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे राज्यभर फिरत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे राज्यात मोर्चे बांधणी करताना दिसत आहेत. या निवडणुकीत जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी त्यांच्या अनेक नेत्यांसोबत गाठीभेटी होत आहेत. भेटायला आलेल्या सर्वांना ते भेट देत आहेत. त्यांचं म्हणणं ऐकून घेत आहेत. या सर्व भेटीगाठी आणि चर्चेनंतर त्यांना राज्यात एक भक्कम मोट बांधायची आहे. असं असतानाच पवार गटासाठी एक मोठी आणि चांगली बातमी आहे. राज्यातील एक तरुण नेते भगीरथ भालके लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. स्वत: भालके यांनीही त्याचे संकेत दिले आहेत.

भगीरथ भालके यांनी आज शरद पवार यांची पुण्यात येऊन भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा ते पाऊण तास चर्चा झाली. सोलापूरमधून निवडणूक लढवण्यासंदर्भात भालके यांनी ही चर्चा केली आहे. तसेच भालके यांनी पवारांकडे तिकिटाची मागणीही केली आहे. त्यामुळे भालके हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. भालके यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यास शरद पवार गटाला संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात चांगलं बळ मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे.

सर्व गोष्टी क्लिअर होतील

शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर भालके यांनी मीडियाशी संवाद साधला. तुम्ही शरद पवार गटात प्रवेश करणार आहात का? असा सवाल भालके यांना विचारण्यात आला. त्यावर, वेळ आल्यावर तुम्हाला कळवेल, असं भालके म्हणाले. मी येणारी विधानसभा लढवणार आहे. हे सोलापूर जिल्ह्याला माहीत आहे. मी साहेबांनाही तसं सांगितलं आहे. येणाऱ्या काळात सर्व गोष्टी क्लिअर होईल, असं भालके म्हणाले.

निवडणूक लढणारच

महाविकास आघाडीकडून मला विधानसभेचं तिकीट मिळावं ही माझी मागणी आहे. लोकसभेच्या निवडणुकीत माढा आणि सोलापूरमध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या उमदेवारांसाठी काम केलं. आम्ही आमच्या भागातून त्यांना मताधिक्य दिलं. त्यामुळे आता विधानसभेत आमचा विचार करतील अशी आशा आहे. महाविकास आघाडी आणि शरद पवारांकडून निवडणूक लढण्यास मी आग्रही असेल. पण मी निवडणूक लढवणारच आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. याबाबत सारासार विचार करून निर्णय घेऊ, असं आश्वासन शरद पवार यांनी दिल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

कोण आहेत भगीरथ?

भगीरथ भालके हे राष्ट्रवादीचे माजी आमदार दिवंगत भारत भालके यांचे चिरंजीव आहेत. भारत भालके यांच्या निधाननंतर पंढरपूर येथे झालेल्या पोटनिवडणुकीत भगीरथ यांचा पराभव झाला होता. भाजपचे समाधान आवताडे विजयी झाले होते. भगीरथ हे विठ्ठल सहकारी कारखान्याचे चेअरमन आहे. त्यांचे सोलापूरमध्ये चांगलं वर्चस्व आहे.

त्यांनी कारखान्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे मदत मागितली होती. पण त्यांना मदत मिळाली नाही. त्यामुळे नाराज होऊन त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर त्यांनी तेलंगनाचे माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षात प्रवेश केला होता. मात्र, भालके आता स्वगृही परतण्याच्या तयारीत आहे. 11 ऑगस्ट रोजी बार्शीत शेतकरी मेळावा पार पडला. शरद पवार यांच्या उपस्थित झालेल्या या मेळाव्याला भगीरथ हे उपस्थित होते. त्यामुळे भगीरथ हे शरद पवार गटात जाणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे.