मुंबई : अखेर मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटला आहे. भाजप नेते अमित शाह यांनी मध्यस्थी केल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा चिढा सुटला आहे. त्यामुळे उरलेल्या मंत्र्यांचा आज किंवा उद्या शपथविधी होण्याची शक्यता असून त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नव्या विस्तारात एकूण 10 जणांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. त्यात भाजप आणि शिंदे गटाच्या प्रत्येकी चार तर राष्ट्रवादीच्या दोघांचा समावेश असणार आहे. शिंदे गटाकडून मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या चार जणांची नावे फिक्स झाली आहेत. या चारही जणांमध्ये पुरुषांचाच समावेश आहे. शिंदे गटात नव्याने आलेल्या मनिषा कायंदे आणि नीलम गोऱ्हे यांचा समावेश नसल्याचं सांगितलं जात आहे.
नव्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा फॉर्म्युला ठरला आहे. 4-4-2 असा हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यानुसार शिंदे गट आणि भाजपला प्रत्येकी चार मंत्रिपदे मिळणार आहेत. तर राष्ट्रवादीला दोन मंत्रिपदे मिळणार आहेत. शिंदे गटाकडून मंत्रिपदाची शपत घेणाऱ्या चौघांची नावे फिक्सही झाली आहेत. यात भरत गोगावले, अनिल बाबर आणि योगेश कदम यांचा समावेश आहे. म्हणजे नव्या विस्तारात कोकणातून दोघांचा तर पश्चिम महाराष्ट्रातून एकाचा समावेश केला जाणार आहे.
शिंदे गटासाठी फुल्ल बॅटिंग करणारे आणि ठाकरे गटाला अंगावर घेणारे शिंदे गटाचे नेते, आमदार संजय शिरसाट यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता फार कमी असल्याचं सांगितलं जात आहे. संजय शिरसाट आणि संजय रायमूलकर या दोघांपैकी एकाचा मंत्रिमंडळात समावेश केला जाणार आहे. शिरसाट आणि रायमूलकर या दोन्ही नेत्यांमध्ये मंत्रिपदाची रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे या दोघांपैकी कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडते हे पाहावे लागणार आहे.
शिंदे गटाकडून एकाही महिलेचा मंत्रिमंडळात समावेश केला जाणार नसल्याचं दिसत आहे. नीलम गोऱ्हे आणि मनिषा कायंदे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार नसल्याचं सांगण्यात येत आहे. नीलम गोऱ्हे यांना आरोग्य खातं मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र, शिंदे गटाच्या वाट्याला फक्त चार मंत्रिपदं आल्याने गोऱ्हे यांना संधी मिळण्याची शक्यता फार कमी असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी आणि भाजपकडून कोण मंत्रिपदाची शपथ घेणार हे गुलदस्त्यात आहे. राष्ट्रवादीकडून नव्या चेहऱ्याला संधी दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर, भाजपकडून गोपिचंद पडळकर यांना संधी दिली जाऊ शकते, असं सांगितलं जात आहे. मुंबई आणि ठाणे महापालिका निवडणुका जिंकणं भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे भाजपकडून नव्या विस्तारात मुंबई आणि ठाण्यातील लोकप्रतिनिधींना स्थान दिलं जाऊ शकतं, अशी माहिती आहे.