Congress : ‘भारत जोडो’ यात्रेमुळे भाजपाला भरली धडकी, जनतेचे लक्ष हटवण्यासाठी टी शर्टवरुन आरोप, काय म्हणाले कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष?

| Updated on: Sep 10, 2022 | 4:00 PM

राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा काढली आहे. 150 दिवसांमध्ये 3 हजार 500 किमीचा प्रवास व 12 राज्यातून ही यात्रा जाणार आहे. महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्था, शेतकरी, कामगार यांच्या प्रश्नावर राहुल गांधी हे थेट केंद्र सरकारला जाब विचारत आहेत.

Congress : भारत जोडो यात्रेमुळे भाजपाला भरली धडकी, जनतेचे लक्ष हटवण्यासाठी टी शर्टवरुन आरोप, काय म्हणाले कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष?
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि खा. राहुल गांधी
Follow us on

मुंबई :  (Congress) कॉंग्रेसच्या (Bharat Jodo) भारत जोडो यात्रेपेक्षा चर्चा रंगली होती ती यात्रे दरम्यान राहुल गांधी यांनी घातलेल्या टी शर्टची. राहुल गांधी यांनी तब्बल 41 हजार 257 रुपयांचा टी शर्ट घातल्याचे समोर आले होते. त्यामुळे भारत जोडो यात्रा राहिली लांब आणि वेगळ्याच विषयाची चर्चा सुरु झाली होती. पण या सर्व बाबींना (Nana Patole) कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही सडेतोड उत्तर दिले आहे. 10 लाखांचा सुट, 1 लाख 5 हजाराचा चष्मा व 8 हजार कोटींचे विमान वापरणाऱ्या फकिर मोदींवरही बोला, असा सवाल सवालच त्यांनी उपस्थित केला आहे. तर या यात्रेने भाजपाला धडकी भरली असून यावर जनतेचे लक्ष जाऊ नये म्हणून हा केलेला प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले आहेत.

150 दिवसांमध्ये 3 हजार 500 किमीचा प्रवास

राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा काढली आहे. 150 दिवसांमध्ये 3 हजार 500 किमीचा प्रवास व 12 राज्यातून ही यात्रा जाणार आहे. महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्था, शेतकरी, कामगार यांच्या प्रश्नावर राहुल गांधी हे थेट केंद्र सरकारला जाब विचारत आहेत. जनतेचे हे प्रश्नच महत्वाचे आहेत हे लोकांच्या प्रतिसादावरून दिसून येत असल्याचे पटोले म्हणाले आहेत.

जनतेच्या प्रतिसादामुळे भाजपाला धडकी

भारत जोडो यात्रे दरम्यान, राहुल गांधी हे सर्वसामान्यांच्या व्यथा जाणून घेत आहेत. त्यामुळे जनता कोणत्या समस्येने त्रस्त आहे हे देखील निदर्शनास येत आहे. शिवाय जनतेशी थेट संवाद होत असल्याने यात्रेमध्ये सहभागी होण्याचे प्रमाणही वाढत आहे. वाढत्या प्रतिसादामुळेच भाजपाला धडकी भरली असून टीशर्टच्या किंमतीसारखे टुकार मुद्दे काढावे लागत असल्याची टीका पटोले यांनी केली आहे.

यात्रेच्या माध्यमातून देश पिंजून काढला जाणार

भारत जोडो ही एक यात्राच नाहीतर जनसामान्यांच्या भावना समजून घेण्यासाठीचा केलेला प्रयत्न आहे. शिवाय जनतेमध्ये गेल्याशिवाय त्यांचे प्रश्न हे समजणार नाहीत. त्यामुळे कन्याकुमारी ते काश्मीर असे यात्रेचे स्वरुप राहणार आहे. त्यामुळे भाजपाने कोणताही मुद्दा घेऊन लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला तरी आता राहुल गांधीच थेट जनतेच्या भेटीला जात असल्याने त्यांचा प्रयत्न साध्य होणार नसल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले आहे.