कोल्हापूर : भारिपचे प्रकाश आंबेडकर लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राज्यभरात सभा घेत आहेत. कोल्हापुरातल्या सभेत त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातले उमेदवार जाहीर केले आहेत. विशेष म्हणजे त्यांची आघाडीत येण्यासाठी चर्चा सुरु असतानाच त्यांनी आघाडीचा बालेकिल्ला असलेल्या काही मतदारसंघांचेही उमेदवार जाहीर करुन टाकले आहेत. प्रकाश आंबेडकर आघाडीत येण्यासाठी 12 जागा देण्याच्या अटीवर ठाम आहेत.
बहुजन वंचित आघाडीकडून साताऱ्यासाठी सहदेव ऐवळे, माढ्यासाठी विजय मोरे, सांगलीसाठी जयसिंग उर्फ तात्या शेंडगे, बारामतीसाठी नवनाथ विष्णू पडळकर, पुण्यासाठी विठ्ठल लक्ष्मण सातव असे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. भारिपला एमआयएमचाही पाठिंबा आहे. त्यामुळे भारिपने स्वबळावर सर्व ठिकाणी तयारी सुरु केली आहे.
वाचा – बारामती लोकसभा : जानकरांनी दमछाक केली, पण यंदा सुप्रिया सुळेंचा मार्ग सुकर
आघाडीसोबत चर्चा सुरु असताना हे उमेदवार जाहीर केल्याने भारिपला खरंच आघाडीत जायचंय का असा प्रश्न निर्माण झालाय. कारण, माढा, बारामती, सातारा हे असे लोकसभा मतदारसंघ आहेत, जिथे मोदी लाटेतही भाजपच्या उमेदवाराचा सुपडासाफ झाला होता. तरीही या मतदारसंघांमध्ये भारिपने उमेदवार जाहीर केले आहेत.
वाचा – माढा लोकसभा : मोदी लाटेतही टिकलेले मोहिते-पाटील पुन्हा गड राखणार?
भारिपला आघाडीत घेण्यासाठी काही दिवसांपूर्वीच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रकाश आंबेडकरांना भेटले होते. पण 12 जागांच्या मागणीवर प्रकाश आंबेडकर ठाम आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतच एका-एका जागेसाठी संघर्ष सुरु असताना आघाडी भारिपला 12 जागा देण्याच्या मूडमध्ये दिसत नाही. त्यामुळेच प्रकाश आंबेडकरांनी स्वबळावर तयारी सुरु केली आहे.
वाचा – सातारा लोकसभा : राष्ट्रवादीच्या आमदारांचा विरोध, तरीही राजे साताऱ्यातून लढणारच!
दरम्यान, यापूर्वीही प्रकाश आंबेडकरांनी काही मतदारसंघांमध्ये उमेदवार जाहीर केले आहेत. बुलडाण्याचाही उमेदवार यापूर्वीच जाहीर झाला होता. तर अकोल्यातून प्रकाश आंबेडकर स्वतः लढतील हे जवळपास निश्चित मानलं जातंय. त्यामुळे आघाडीच्या अगोदरच भारिपने उमेदवार जाहीर केले आहेत.