रत्नागिरीः तुम्ही तुमच्या ज्येष्ठ नेत्यांना कोपऱ्यात बसवून ठेवलं. लालकृष्ण आडवाणींचं (Lalkrishna Adwani ) तेच केलं. मनोहर जोशी कुठे आहेत, हेही कुणाला माहिती नाही. पण आम्ही आमच्या बाळासाहेब ठाकरेंना (Balasaheb Thackeray) विसरणार नाहीत, अशी परखड टीका शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केली आहे. ठाकरे सरकारच्या काळात विविध सणांवर निर्बंध घातले गेले. मात्र शिंदे-भाजप सरकारमध्ये जनतेला सगळेच सण उत्सव उत्साहाने साजरे करता आले, असं वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलं होतं. त्यावर भास्कर जाधव यांनी स्पष्टीकरण दिलंय.
रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी टीका केली. भास्कर जाधव म्हणाले, भाजपच्या नेत्यांमध्ये खोटं बोलण्याची स्पर्धा सुरु आहे.
ठाकरे सरकारच्या काळात सणांवर निर्बंध घातले ते केंद्र सरकारच्या नियमानुसारच होते. याचा भाजप नेत्यांना विसर पडलेला दिसतोय.
कोरोनाच्या निर्बंधांमध्ये ईदचा सण पार पडला आणि दहीहंडीच्या सणाला निर्बंध उठले. त्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते.
दहीहंडीला मोकळीक मिळते आणि आयपीएलला बंदी होते, हे बोलणारे जे पी नड्डा खोटे आरोप करण्याच्या नादात खोटे बोलून जातात, हे महाराष्ट्राला दिसलं, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.
बाळासाहेब ठाकरे हे आमचे सर्वस्व आहेत. आम्ही त्यांना विसरावे, अशी भाजप नेत्यांची इच्छा आहे, कारण भाजपला मोठं करणाऱ्या सर्व वरिष्ठ नेत्यांना भाजप विचारत नाही, अशी टीका जाधव यांनी केली.
देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचं नाव तुम्ही विसरला आहात. ज्या लालकृष्ण आडवाणींनी संपूर्ण देशात रथयात्रा काढली, जेल भोगलं, त्यांना तुम्ही एका कोपऱ्यात बसवून ठेवलंय.
मुरली मनोहर जोशींच्या नेतृत्वात विद्यमान पंतप्रधान काश्मीरमध्ये रॅली घेऊन गेले. आज ते मुरली मनोहर जोशी कुठे आहेत, तेसुद्धा कुणाला माहिती नाही….
तुम्ही तुमच्या नेत्यांना विसरला तसं आम्ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना विसरावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुमची नीतिमत्ता तुमच्याजवळ, आमचाही निश्चय ठाम आहे, असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलंय.