मुंबई : डॉ. प्रदीप कुरुलकर प्रकरण मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्यावर ठाकरेगटाचे नेते भास्करराव जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे. तसंच शिवसेनेच्या वर्धापन दिनावर आणि महाविकास आघाडीवरही भास्करराव जाधव बोललेत. महाविकास आघाडीच्या बैठकीवर आणि शरद पवार यांच्या घरातील बैठकीतील मुद्द्यांवरही भास्करराव जाधव बोललेत.
“संघाशी जोडलेले कुरुलकर हनी ट्रॅपमध्ये अडकतात आणि देशाशी जोडलेली संरक्षण संदर्भातील माहिती बाहेर जाते.ते प्रदीप कुरुलकर आहेत म्हणून भारतीय जनता पार्टीवाले गप्प आहेत. तेच जर परदेशी किंवा कुरेशी असते तर भाजपचे राष्ट्रीयत्व दिसून आलं असतं. दुसऱ्याचं ते कार्टे आणि आपले ते बाळ अशी भाजपची भूमिका आहे.पण आता देशाला त्यांचा खरा रूप खरा चेहरा दिसला आहे”, असं भास्कर जाधव म्हणालेत.
शरद पवार यांच्या बंगल्यावर जी बैठक झाली, ती तीन प्रमुखांनी बाहेर येऊन माहिती दिली. नंतर नाना पटोले यांनीही माहिती दिली. मी जयंत पाटील यांची पाहिलेली मुलाखत पाहिली. तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्र चर्चा केली, असं भास्करराव जाधव म्हणालेत.
शिवसेना पक्षाचा वर्धापनदिन आहे. त्यावर भास्करराव जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंढरपूरमध्ये विठ्ठल आणि शिर्डीमध्ये साईबाबा एकच आहेत. तशाच पद्धतीने शिवसेना एकच आहे. जर शिवसेनेचा वर्धापन दिन कोणाला साजरा करायचा असेल तर त्यांचं मी स्वागत करतो. कुणीतरी आयडिया गैराने शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करायचा म्हटला तर आम्हाला त्यामध्ये वाईट वाटायचं कारण नाही. घराघरात साजरा व्हावा आणि जे कोणी साजरा करत असतील त्यांना माझ्या शुभेच्छा. फक्त स्वार्थाकर्ता शिवसेना नको तर खऱ्या अर्थाने शिवसेनाप्रमुखांची विचारासाठी शिवसेना असावी. एवढीच आमची भूमिका आहे, असं ते म्हणालेत.
कर्नाटकमध्ये भाजपाला फटका बसला हे मान्य करता म्हणून शितावरून भाताची परीक्षा. त्यांना पुन्हा फटका बसेलच. महाराष्ट्रातही महाविकास आघाडीचंच सरकार सत्तेत येईल, असंही भास्करराव जाधव म्हणालेत.