सातारा : माझ्यासमोर उमेदवार पृथ्वीराज चव्हाण असतील तर काय झालं? का नसावेत? लोकशाही आहे. कुणीही उभे राहू द्या, मी उमेदवार आहेच. फक्त अभिजीत बिचकुलेचं (Udayanraje and Abhijit Bichukale) नाव घेऊ नका मला अटक होईल, असा टोला उदयनराजेंनी लगावला आणि त्यानंतर साताऱ्यात नवं राजकारण सुरु झालं. अभिजित बिचुकलेने (Udayanraje and Abhijit Bichukale) आता उदयनराजेंविरोधात लढण्याची भूमिका घेतली आहे. शिवाय बिचुकलेचा पक्ष राज्यातील सर्व 288 जागा लढवणार असल्याचंही त्याने म्हटलंय.
कोणतीही निवडणूक नाही, जी साताऱ्याचे कवी मनाचे नेते अभिजित बिचुकलेंनी लढवली नाही. नगरपालिका, विधानसभा, लोकसभा, अशा निवडणुका बिचुकलेंनी आपल्यासह पत्नी अलंकृताराजे बिचुकले यांना सोबत घेऊन लढल्या. 2014 पासून लोकसभेची निवडणूक उदयनराजे भोसले यांच्याविरोधात एकमेव व्यक्ती लढा देतोय तो म्हणजे अभिजित बिचुकले.
अभिजित बिचुकलेंचा बिग बॉस 2 च्या पर्वानंतर एक वेगळा चाहता वर्ग तयार झालाय. कविता, शायरी, डायलॉगबाजी ज्यावेळेस समोर येते त्यावेळेस साताऱ्यात एकच नाव पुढे येतं आणि ते म्हणजे अभिजित बिचुकले… .साताराच नव्हे तर सांगलीतही स्व. पंतगराव कदम यांचे चिरंजीव विश्वजित कदम यांच्याविरोधात विधानसभा लढविली असल्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 288 जागा लढविण्याचा मानस बिचुकलेंनी ठेवलाय.
अखिल बहुजन समाज सेना पक्ष स्थापन करुन महाराष्ट्रात 288 जागांवर विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं बिचुकलेंनी सांगितलं. शिवाय त्यांनी उदयनराजे भोसले यांना देखील पक्षात येण्याचं आमंत्रण त्यांनी दिलं आहे. या पुढील काळात साताऱ्यात पोटनिवडणूक लागली तर बिचुकलेंनी उदयनराजे भोसले यांना हरवून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार असल्याचं स्वप्न पाहिलंय. त्यामुळे कवी मनाचे नेते अभिजित बिचुकलेंना आता सातारची जनता कसा प्रतिसाद देते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.