मुंबई : बिग बॉस विजेती शिल्पा शिंदेने काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. काँग्रेस हा जातीयवादी पक्ष नसल्याचं तिने म्हटलंय. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत शिल्पा शिंदेने काँग्रेसचा झेंडा हातात घेतला. भाभीजी घर पे है या मालिकेतून शिल्पा शिंदे प्रसिद्ध झाली. राहुल गांधींनी पंतप्रधान व्हावं, असं शिल्पा शिंदेंचं स्वप्न आहे.
संधी मिळाली तर निवडणूक लढवेन, असंही शिल्पा शिंदे म्हणाली. मुंबईतून लोकसभा निवडणूक लढण्याचा तिचा हेतू असल्याचं बोललं जातंय. मनसेकडून सारखं मराठी, मराठी केलं जातं. पण काँग्रेसकडून जात पाहिली जात नाही. काँग्रेसने या देशावर 70 वर्षे राज्य केलंय. आता पुन्हा एकदा काँग्रेसची गरज आहे, अशी प्रतिक्रिया तिने काँग्रेसमधील प्रवेशानंतर दिली.
कोण आहे शिल्पा शिंदे?
मूळची महाराष्ट्रातील असलेल्या शिल्पा शिंदेचा जन्म 28 ऑगस्ट 1977 रोजी झाला. वडील डॉ. सत्यदेव शिंदे हायकोर्टाचे न्यायमूर्ती होते. मुलीने कायद्याचं शिक्षण घ्यावं, अशी वडिलांची इच्छा असली तरी शिल्पाने अभिनय क्षेत्रात असलेली आवड कायम ठेवली. तिने आवड जोपासत बिग बॉसच्या माध्यमातून मोठी प्रसिद्धी मिळवली.
‘भाभीजी घर पे है’ या मालिकेतून शिल्पा शिंदेने छोट्या पदड्यावर पदार्पण केलं. अल्पावधीत तिचं अंगुरी भाभी पात्र लोकांच्या घराघरात पोहोचलं. या टीव्ही शोवरुन झालेल्या वादामुळे शिल्पा शिंदे चर्चेत आली होती. प्रकृतीचं कारण देत शिल्पा शिंदेने शोमधून एक्झिट घेतली. कराराचं उल्लंघन केल्याने तिच्यात आणि निर्मात्यांमध्ये वाद झाला. प्रोडक्शन टीमचे काही जण त्रास देतात, शिवाय करिअर संपवण्याची धमकी देतात, असा आरोप शिल्पा शिंदेने केला होता.
दरम्यान, या प्रकरणानंतर निर्माता बिनफेर कोहली यांनी सिन्टामध्ये शिल्पा शिंदेविरोधात तक्रार केली होती. यानंतर सिन्टाने नॉन कॉर्पोरेशन सर्क्यूलर काढण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे शिल्पा भविष्यात कोणत्याही चॅनेल किंवा निर्मात्यांसोबत काम करु शकत नसल्याचा उल्लेख होता. पण आता तिने राजकारणात एंट्री घेतल्यामुळे नवा एपिसोड सुरु होणार आहे.