सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वंचित बहुजन आघाडीचे सांगलीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना मोठा प्रस्ताव दिला होता. त्यानंतर पडळकर 4 दिवस गप्प बसले. मात्र, सांगलीत येऊन त्यांनी वेगळी भूमिका घेत आपली उमेदवारी जाहीर केल्याचा गौप्यस्फोट महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. पाटील सांगली येथे आयोजित धनगर समाजबांधव मेळाव्यात बोलत होते.
गोपीचंद पडळकर यांच्यासमोर मुख्यमंत्री फडणवीसांनी लोकसभेच्या उमेदवारीपेक्षाही मोठा प्रस्ताव ठेवला होता, असे सांगून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाचे आहेत, फक्त हेच बघू नका. भाजपने धनगर समाजाला किती न्याय दिला याचाही विचार करा. सांगलीच्या महापौर संगिता खोत, जलसंवर्धन मंत्री राम शिंदे, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनाही भाजपने न्याय दिला आहे.’
जनसंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने कधीही आपल्या स्वयंसेवकाला आणि कार्यकर्त्याला जात-पात शिकवली नाही, असेही चंद्रकांत दादा पाटील म्हणाले. ते पुढे म्हणाले, ‘शरद पवारांनी भाजपविषयी गैरसमज पसरवले होते. त्यामुळे खूप काळ मराठा समाज भाजपपासून दूर होता. मात्र, मराठा, धनगर समाजाबरोबर सर्व जातीचे लोक आत्ता भाजपसोबत आले आहेत.’
पाहा व्हिडीओ: