आरे येथील मेट्रो भवन निविदा प्रक्रियेत महाघोटाळा, सचिन सावंत यांचा गंभीर आरोप

| Updated on: Aug 26, 2019 | 4:42 PM

एका विशिष्ट कंत्राटदाराच्या फायद्यासाठी आरे येथील मेट्रो भवन कंत्राटात कोट्यावधींचा महाघोटाळा केल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. संबंधित कंत्राटदाराच्या फायद्यासाठी सरकारी टेंडरमध्ये मॅच फिक्सिंग रॅकेट झाल्याचेही सावंत यांनी यावेळी म्हटले.

आरे येथील मेट्रो भवन निविदा प्रक्रियेत महाघोटाळा, सचिन सावंत यांचा गंभीर आरोप
Follow us on

मुंबई : एका विशिष्ट कंत्राटदाराच्या फायद्यासाठी आरे येथील मेट्रो भवन कंत्राटात कोट्यावधींचा महाघोटाळा (Big Scam) केल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी केला आहे. संबंधित कंत्राटदाराच्या फायद्यासाठी सरकारी टेंडरमध्ये मॅच फिक्सिंग रॅकेट झाल्याचेही सावंत यांनी यावेळी म्हटले. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

सचिन सावंत म्हणाले, “केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार कंत्राटामध्ये निर्देशित अटी आणि शर्ती शुद्धीपत्रकांमध्ये शिथिल करता येऊ शकतात. मात्र, त्या अधिक कडक करता येत नाहीत. कंत्राटाच्या सर्वसाधारण नियमांमधील (GCC) कलम 402 नुसार कामाच्या हमीची सुरक्षा (Performance Security) म्हणून कंत्राट रकमेच्या 2 टक्के रक्कम सुरक्षा अनामत म्हणून ठेवण्याची अट होती. मात्र, सरकारने शुद्धीपत्रकात ही अट बदलून एकूण कंत्राटाच्या 10 टक्के रक्कम कामाच्या हमीची सुरक्षा म्हणून ठेवण्याची अट घातली. याप्रमाणे निविदेमधील 20 कोटींची सुरक्षा अनामत रक्कम शुद्धीपत्रकाद्वारे 100 कोटी रुपये करण्यात आली.”

मूळ निविदेमध्ये कंपनीची वार्षिक उलाढाल (Annual Turnover) 244 कोटींपेक्षा अधिक असावी अशी अट होती. मात्र, शुद्धीपत्रकात ही अट बदलून गेल्या 5 वर्षातील वार्षिक उलाढाल 250 कोटींपेक्षा अधिक असावी अशी अट टाकली. निविदेच्या अटींमध्ये केलेले हे सर्व बदल अभूतपूर्व असून केवळ एका विशिष्ट कंत्राटदाराला हे कंत्राट मिळावे म्हणून केल्याचा आरोप सचिन सावंत यांनी केला.

‘या कंत्राटदारांचा लवकरच पर्दाफाश’

सचिन सावंत यांनी यावेळी संबंधित भ्रष्टाचारात सहभागी कंत्राटदारांचा लवकरच पर्दाफाश करणार असल्याचेही म्हटले. ते म्हणाले, “या कंत्राटामध्ये कमी किमतीची निविदा भरणारा कंत्राटदार कोण आहे हे लवकरच जाहीर करू. या कंत्राटाचा संबंध एका मोठ्या कंत्राटाशी आहे हेही लवकरच उघड करू.”

या कंत्राटामध्ये सत्ताधारी पक्षाचे हितसंबंध असल्याचा आरोप करत सचिन सावंत यांनी या घोटाळ्याची चौकशी उच्चस्तरीय समिती आणि सीबीआयमार्फत (CBI) करावी, अशी मागणी केली.