मुंबई : दसरा मेळाव्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. दसरा मेळाव्यावरून शिंदे गट (Eknath Shinde) आणि शिवसेना (Shiv Sena) आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे. दोन्ही गटाकडून दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कची मागणी करण्यात आली होती. मात्र अद्यापही यावर तोडगा निघालेला नाही. तर दुसरीकडे आता बीकेसीतील (BKC) मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाचा अर्ज महापालिकेने स्विकारल्याची माहिती देखील समोर येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेच्या वतीने देखील दसरा मेळाव्यासाठी बीकेसीतील मैदानाची मागणी करण्यात आली होती. मात्र महापालिकेकडून शिवसेनेचा अर्ज फेटाळण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. शिवाजी पार्कवर यंदा दसरा मेळावा होणार की नाही होणार? झाल्यास कोणाचा होणार हे अद्यापही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. शिवाजी पार्कबाबत मुंबई महापालिका काय निर्णय घेणार याकडे आता राज्याचं लक्ष लागलं आहे.