पाटणा (बिहार) : बिहारमधील भाजप नेते आणि माजी आमदार अनुज कुमार सिंह यांचे राहते घर डायनामाईटने उडवण्याचा नक्षलवाद्यांनी प्रयत्न केला. सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सध्या बिहार पोलिस या हल्ल्याची कसून चौकशी करत आहेत. मात्र लोकसभा निवडणुका तोंडावर असताना अशाप्रकारे राजकीय नेत्याच्या घरी हल्ला होणे, ही सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारमधील डुमरिया परिसरात भाजपचे माजी आमदार अनुज कुमार सिंह राहतात. काल रात्री एक वाजण्याच्या सुमारास अनुज कुमार सिंह यांच्या घरी अचानक 50 नक्षलवादी घुसले. त्यानंतर या नक्षलवाद्यांनी घरातील नातेवाईकांना जबरदस्त मारहाण करत घराबाहेर काढले. त्यानंतर या सर्व नक्षलवाद्यांनी घरात डायनामाईटचा स्फोट केला. सुदैवाने या स्फोटमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र त्यांच्या घराचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
तसेच, या स्फोटाचे धक्के आजूबाजूच्या परिसरालाही बसले असून, त्यांचेही नुकसान झाले आहे. या हल्ल्यानंतर डुमरिया गावातील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
Gaya: Residence of former MLC & BJP leader Anuj Kumar Singh in Dumariya blasted with dynamite by Naxals last night. No casualties reported. The Naxals also left a poster demanding boycott of elections. Police investigation underway. #Bihar pic.twitter.com/bcr8xNQczX
— ANI (@ANI) March 28, 2019
बिहार पोलिस आणि सीआरपीएफच्या जवानांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, डुमरिया परिसारात नेहमीच नक्षलवाद्यांचा वावर असतो. यामुळे सर्व नागरिक आपला जीव मुठीत घेऊन जगतात. याबाबत पोलिस प्रशासन मात्र काहीच कारवाई करत नाही.
दरम्यान, डूमरिया परिसरात येत्या 11 एप्रिल रोजी लोकसभेसाठी मतदान पार पडणार आहे. मात्र त्याआधी अशाप्रकारे राजकीय नेत्याच्या घरी नक्षलवाद्यांनी हल्ला केल्याने राजकीय वर्तुळास संपूर्ण बिहारमध्ये खळबळ उडाली आहे.