आजकाल अमृता फडणवीस हे एक चर्चेतलं नाव बनले. मग ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी म्हणून असेल किंवा त्यांच्या स्वतःच्या रोखठोक मतांमुळे असेल. अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याइतकीच लोकप्रियता मिळवली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अलीकडेच राजकीय क्षेत्रातही त्यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर देत स्वतःची ‘डॅशिंग’ ओळख सिद्ध केली आहे. आज याच ‘डॅशिंग’ व्यक्तिमत्वाचा अर्थात अमृता फडणवीस यांचा वाढदिवस. खरंतर राजकारण हे अमृता ह्यांचं क्षेत्र नाही. पण पती देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे त्या राजकीय क्षेत्रातही ओळखीच्या चेहरा ठरला. त्यांचा आतापर्यंतचा प्रवास निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांनी बँकिंग, गायन, राजकारण अशा विविध क्षेत्रांत स्वतःचा विशेष ठसा उमटवला आहे. (Birthday of Amrita Fadnavis, wife of Devendra Fadnavis and dashing personality)
अमृता फडणवीस (पूर्वाश्रमीच्या रानडे) यांचा जन्म 9 एप्रिल 1979 रोजी झाला. एक भारतीय बँकर, गायिका आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे लग्न झाले. नागपूर येथील नेत्ररोग तज्ज्ञ शरद रानडे आणि स्त्रीरोग तज्ज्ञ चारुलता रानडे यांच्या त्या कन्या. त्यांनी सुरुवातीचे शिक्षण नागपूरच्या सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलमध्ये घेतले. त्या राज्यस्तरीय 16 वर्षांखालील टेनिसपटू होत्या. त्यांनी जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, नागपूर येथून पदवी प्राप्त केली. नंतर फायनान्समध्ये एमबीए केले आणि सिम्बायोसिस लॉ स्कूल, पुणे येथून टॅक्सेशन कायद्याचा अभ्यास केला. अभ्यासासोबतच त्यांनी खेळातही भाग घेतला.
अमृता या अॅक्सिस बँकेच्या उपाध्यक्ष आहेत. त्या बँकिंग क्षेत्रात मागील 17 वर्षांपासून कार्यरत आहेत. सुरुवातीला कार्यकारी रोखपाल म्हणून त्या रुजू झाल्या होत्या तर सध्या ट्रान्झॅक्शन बँकिंग विभागाच्या उपाध्यक्ष म्हणून काम करतात. जानेवारी 2015 मध्ये त्यांची वरळी, मुंबई येथील कॉर्पोरेट कार्यालयात बदली झाली. पती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतरही त्यांनी अॅक्सिस बँकेत काम सुरू ठेवले. त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखालील आंतरराष्ट्रीय शांतता उपक्रम, 2017 मधील नॅशनल प्रेयर ब्रेकफास्टमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
सामाजिक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने अमृता फडणवीस यांनी महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी काम सुरु ठेवले आहे. विकास आणि आर्थिक प्रगतीसाठी त्यांनी फेटरी आणि कवडस ही गावे दत्तक घेतली आहेत. स्वच्छता आणि पायाभूत सुविधांचा विकास करणे हे त्यांचे ध्येय आहे. सफाई कामगारांच्या कल्याणासाठी त्यांनी BMC सोबत भागीदारी केली आहे. तसेच कामगारांच्या कल्याणकारी कार्यक्रमासाठी फिल्म सिटीसोबत भागीदारी केली आहे. त्याचबरोबर न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये हातमाग आणि मुलींच्या शिक्षणाच्या जाहिरातीसाठी फडणवीस यांनी शोस्टॉपर म्हणून रॅम्प चालवला आहे. नवीन संधी निर्माण करण्यावर विश्वास ठेवणाऱ्या अमृता फडणवीस यांच्या पुढाकारातून रुजलेला ‘मिट्टी के सितारा’ हा दिव्याज फाऊंडेशनचा प्रकल्प आहे. हा सात ते पंधरा वयोगटातील वंचित मुलांसाठी टॅलेंट हंट रिअॅलिटी शो आहे. एकूणच त्यांनी बँकिंग क्षेत्रात कार्यरत असताना सामाजिक बांधिलकीही जोपासली आहे. (Birthday of Amrita Fadnavis, wife of Devendra Fadnavis and dashing personality)