मुंबई: राज्यातील आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने (BJP) आता एक नवी चाल खेळली आहे. त्यासाठी भाजपकडून आता पडद्यामागे राहुन सूत्रे हलवणाऱ्या आपल्या नेत्यांवर नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यापैकी सुनील कर्जतकर यांच्या नावाची सध्या राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा सुरु आहे. (BJP new strategy for upcoming Mahanagarpalika election)
सुनील कर्जतकर यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्यादृष्टीने त्यांच्यावर संयोजक पदाची महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
सुनील कर्जतकर हे 1984 पासून भाजपमध्ये कार्यरत आहेत. नाशिक, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई यासारख्या महत्वाच्या शहरांमध्ये निवडणूक आणि संघटना वाढवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
आगामी निवडणुका भाजपसाठी प्रतिष्ठेच्या आहेत. अशात भाजपने पक्षातील अनुभवी आणि विश्वासपात्र नेत्यांकडे जबाबदारी देण्यास सुरुवात केली आहे. कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निकालावर पुढच्या लोकसभा आणि प्रामुख्याने विधानसभेची दिशा ठरणार आहे.
गेल्या काही काळापासून भाजपमधून महाविकासआघाडीत होणारे आऊटगोईंग वाढले आहे. त्यामुळे पक्षाला लागलेली गळती रोखणे हे भाजपसमोरील मुख्य आव्हान आहे.
नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीच्या निकालांनी भाजपला आत्मचिंतन करण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले मात्र काही काळ अंतर्गत राजकारणामुळे मुख्य प्रवाहापासून लांब गेलेल्या निष्ठावंतांवर पुन्हा एकदा नवीन जबाबदारी देऊन विश्वास टाकला जात आहे.
मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या निवडणुकांना समोरे जाण्यासाठी भाजपने 18 ते 25 वयोगटातील तरुणांची युवा वॉरियर्स निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ओबीसींना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी राज्यातील 36 जिल्ह्यात ओबीसी हक्क परिषदांचं आयोजन केलं आहे.
संबंधित बातम्या:
आशिष शेलार म्हणाले, काँग्रेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष होईल, पण…..
युवा वॉरियर्स, ओबीसी हक्क परिषद; भाजपची महापालिकेसाठी मोर्चाबांधणी सुरू
(BJP new strategy for upcoming Mahanagarpalika election)