किंचित वंचितचं लिव्ह इन रिलेशनशिप, भाजपच्या भीतीपोटी पळापळ, आशिष शेलारांचं जिव्हारी लागणारं वक्तव्य…

| Updated on: Jan 24, 2023 | 1:39 PM

शिवसेना आणि वंचित आघाडीच्या युतीवर बोलताना आशिष शेलार म्हणाले, कुणीतरी खरच म्हटलंय. किंचित आणि वंचित एकत्र आलेत....

किंचित वंचितचं लिव्ह इन रिलेशनशिप, भाजपच्या भीतीपोटी पळापळ, आशिष शेलारांचं जिव्हारी लागणारं वक्तव्य...
Image Credit source: social media
Follow us on

मुंबईः उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीमुळे महाराष्ट्रातील राजकारणाला नवी दिशा मिळणार, अशी चर्चा असतानाच भाजप नेत्याने या युतीची जोरदार खिल्ली उडवली आहे. भाजपच्या भीतीने उद्धव ठाकरे यांची पळापळ होत आहे. त्यामुळे किंचित आणि वंचितची ही लिव्ह इन रिलेशनशिप आहे, असं जिव्हारी लागणारं वक्तव्य आशिष शेलार यांनी केलंय. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आज पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर घणाघाती टीका केली.

काय म्हणाले आशिष शेलार?

शिवसेना आणि वंचित आघाडीच्या युतीवर बोलताना आशिष शेलार म्हणाले, कुणीतरी खरच म्हटलंय. किंचित आणि वंचित एकत्र आलेत. त्यांचं हे लिव्ह इन रिलेशनशिप आहे. आमच्या भीतीपोटी त्यांची पळापळ होतेय. म्हणून कधी उद्धव ठाकरे मराठी मुस्लिमांच्या मागे लागतात तर कधी वंचितच्या मागे लागतात…

क्रेडिट घेण्याचा धंदा…

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र शिवसेना तसेच महाविकास आघाडीने त्यांच्याविरोधात केलेल्या आंदोलनामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागतोय, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना आशिष शेलार म्हणाले, त्यांनी मोर्चा काढला होता त्याचे काय झाले? त्यांनी आंदोलन केले होते.. पण जनतेने त्यांना पाठिंबा दिला नाही. त्यामुळे एका संवेदनशील मनाचं प्रतिनिधित्व स्वतः राज्यपाल यांनी केले आहे. राज्यपाल भगतिसंह कोश्यारी आज स्वतःच जाऊ इच्छितात म्हटल्यावर त्याच्यावर क्रेडिट घेण्याचा धंदा म्हणजे उद्धव ठाकरे यांचे हे वाक्य आहे, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.

‘उद्धव ठाकरे शेठजी….’

मुंबई महापालिकेवरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना आशिष शेलार म्हणाले, ‘
आम्ही पारदर्शी पद्धतीने चौकीदारी केली म्हणून या ठेवी राहिल्या आहेत. उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिका शेठजीसारखी चालवली. मी, शेठजी यासाठी म्हणतो की त्यांनी कामे केली ती धनदांडग्या शेठजीसाठी…मग कधी ताजला सूट द्या.. बिल्डरांना प्रीमियममध्ये सूट द्या… कधी डिस्कोसारख्या बार मालकांना सूट द्या.. ठेकेदारांना सूट द्या.. काल स्वतः तेच म्हणाले की, ते ठेकेदारांचे पैसे आहेत.

ठेकेदारांचे पैसे परत देण्यासाठी शेठजी उद्धव ठाकरे त्या ठिकाणी लक्ष देत आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षाने टाकलेला दरोडा आणि डाकूंपासून मुक्त करणे यासाठी मुंबईकरांबरोबर भारतीय जनता पक्ष आहे. स्वतः उद्धव ठाकरेजींच्या पक्षाने केलेला वैचारिक स्वैराचार हा इतिहासात नोंदला जाईल असा आहे.