मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep deshpande) यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यावरून महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. मुंबईत आज अगदी सकाळी शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉकला गेलेल्या संदीप देशपांडे यांच्यावर मास्कधारी व्यक्तींनी स्टँप आणि रॉडने हल्ला केला. यातून संदीप देशपांडे बचावले. त्यांना हात आणि पायाला दुखापत झाली आहे. पण मला देखील अशाच प्रकारे जीवे मारण्याची धमकी आली आहे. तुला गोळ्या झाडून ठार मारून टाकू, अशा आशयाचे फोनकॉल आल्याचं भाजप नेते आशिष शेलार यांनी सांगितलं. संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ला आणि मला आलेल्या धमक्यांमध्ये समान धागा आहे का, असा संशय येत असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.
संदीप देशपांडे यांच्या हल्ल्यावर आज भाजप नेते आशिष शेलार यांनी विधिमंडळाबाहेर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘ अतिशय चुकीच्या पद्धतीने राजकारणात काम करणाऱ्या व्यक्तींवर हल्ला होतोय. संदीप देशपांडे यांच्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. पोलीस गुन्हेदगाराला पकडतील. या प्रकरणाचा छडा लागेल, असं मला वाटतंय. मलाही धमक्यांचे फोन येत आहेत. मलाही गोळ्या झाडून माराव्यात, अशी सुपारी देण्यात आल्याची माहिती कंट्रोल रुमला आली आहे. त्याआधी मला पत्रही आलं होतं. यातून काही समान धागा निघतोय का, याची चौकशी पोलिसांनी करावी.
दरम्यान, संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याचे आज महाराष्ट्रभर पडसाद उमटत आहेत. विधानसभेत आज भाजप आमदार नितेश राणे यांनीदेखील यावर भाष्य केलं. गेल्या काही दिवसांपासून संदीप देशपांडे हे उद्धव ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई यांच्याविरोधात बोलत आहेत. कदाचित त्यांचाही या हल्ल्यात हात असू शकतो, पोलिसांनी या प्रकरणी सखोल चौकशी करावी, अशी मागणी नितेश राणे यांनी सभागृहात केली.
संदीप देशपांडे यांच्यावर शिवाजी पार्क परिसरात आज सकाळी सात वाजेच्या सुमारास प्राणघातक हल्ला झाला. मात्र देशपांडे यांनी हल्ल्याचा प्रतिकार केला. या झटापटीत संदीप देशपांडे यांचा हात आणि पायाला दुखापत झाली. त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना डिश्चार्जही देण्यात आला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे, भाजप आमदार नितेश यांनी हिंदुजा रुग्णालयात भेट घेतली. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यानंतर विधानसभेत नितेश राणे यांनी या हल्ल्याचा मुद्दा उपस्थित केला.