दिवसा आमची सोबत, रात्री काँग्रेसशी चर्चा, मुनगंटीवारांचा सेनेवर हल्ला, फडणवीस म्हणाले, उत्तर द्या!

| Updated on: Jan 20, 2020 | 1:43 PM

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणां यांनी, शिवसेनेकडून 2014 मध्येही काँग्रेसला सत्तास्थापनेचा प्रस्ताव आला होता, असा गौप्यस्फोट केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दिवसा आमची सोबत, रात्री काँग्रेसशी चर्चा, मुनगंटीवारांचा सेनेवर हल्ला, फडणवीस म्हणाले, उत्तर द्या!
Follow us on

नवी दिल्ली: माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणां यांनी, शिवसेनेकडून 2014 मध्येही काँग्रेसला सत्तास्थापनेचा प्रस्ताव आला होता, असा गौप्यस्फोट केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याबाबत आता भाजपने शिवसेनेला (BJP attacks on Shiv Sena) घेरण्यास सुरुवात केली आहे.  भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता शिवसेनेने याबाबत (BJP attacks on Shiv Sena) उत्तर द्यावं, अशी मागणी केली आहे. ते राजधानी दिल्लीत टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ खरंतर याचं उत्तर शिवसेनेने द्यायचं आहे. पृथ्वीराज चव्हाणांनी जो खुलासा केला आहे तो गंभीर आहे. 2014 मध्येही शिवसेना-काँग्रेससोबत जाण्यास तयार होती तर याचा अर्थ असा आहे की शिवसेनेकरिता विचार, आयडोलॉजी नाही. केवळ सत्ता आहे, त्यामुळे शिववसेनेने याचं उत्तर द्यावं”.

दिवसा आमची सोबत, रात्री काँग्रेसशी चर्चा : मुनगंटीवार

दरम्यान, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही शिवसेनेवर हल्ला चढवला. “2014 पासून काँग्रेस-शिवसेना संपर्क असल्याच्या पृथ्वीराज चव्हाण यांचा खुलासा धक्कादायक आहे, शिवसेनेचा सत्तामोही चेहरा यामुळे पुढे आला आहे. दिवसा आमची सोबत आणि रात्री कॉंग्रेसशी चर्चा हे क्लेषदायक आहे. सत्ता जाऊ नये म्हणून सावरकर विचारांकडे डोळेझाक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव सत्ता टिकविण्यासाठी, गेली काही वर्षे युती एका विचारधारेवर आधारित होती या भावनेला चव्हाण यांच्या खुलाशाने तडा गेला, असं मुनगंटीवार म्हणाले.

संजय राऊत यांचा अंदमान शिक्षेचा प्रस्ताव स्वागतार्ह आहे, जो कुणी सावरकर विचारांना विरोध करेल त्याला 2 दिवस अंदमानमध्ये शासकीय खर्चाने पाठवा, अर्थसंकल्पात तशी तरतूदच करा, काहींना ही शिक्षा पाहिजे असल्यास 1 दिवस आणखी वाढवा, असा टोलाही मुनगंटीवारांनी लगावला.

पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले?

“शिवसेनेकडून 2014 मध्येही सत्ता स्थापनेचा प्रस्ताव आला होता. मात्र, त्यावेळी काँग्रेसने नकार दिल्यामुळे ते शक्य होऊ शकले नाही”, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी  ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत केला.

“भाजपने 2014 साली अल्प मतांवर सरकार स्थापन केल्यानंतर शिवसेनेकडून आघाडीचे सरकार स्थापन व्हावे यासाठी प्रस्ताव आला होता. यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीने माझ्याशी संपर्क साधला. मात्र, मी तो प्रस्ताव फेटाळून लावला. त्यावेळी काँग्रेसला कमी जागांवर यश आले होते. त्यामुळे आम्ही विरोधात बसणार हे निश्चित होते. राजकारणात जय-पराजय होत असतात”, असे पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले.

संबंधित बातम्या 

2014 मध्येही शिवसेनेकडून सत्तास्थापनेचा प्रस्ताव होता, पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट