मुंबई : मीही मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहातोय; असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केल्याचं वृत्त प्रसारित झाल्यानंतर भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. आता महाविकास आघाडीत फक्त राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना मुख्यमंत्रिपदाची स्वप्नं पडायची बाकी आहेत, असा टोमणा भातखळकरांनी मारला. (BJP Atul Bhatkhalkar taunts Rohit Pawar over Jayant Patil’s dream of being Chief Minister)
जयंत पाटलांचं उद्दिष्ट
“गेली 20 वर्ष राजकारणात सक्रिय आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहणे हे नक्कीच ‘दिवास्वप्न’ नाही, तर राजकारणातील शक्तीने हे स्वप्न हस्तगत करणं हेच आपलं उद्दिष्ट आहे” असं जयंत पाटील म्हणाले. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये कार्यक्रमासाठी गेले असताना जयंत पाटील यांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना मुख्यमंत्रिपदाबाबतचं आपलं स्वप्न उघड केलं. जयंत पाटलांच्या या वक्तव्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात असून अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.
भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मोजक्या शब्दात ट्विटरवर प्रतिक्रिया दिली, मात्र महाविकास आघाडी सरकारमधील डझनभर नेत्यांवर त्यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधण्याचं काम केलं.
मीही मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहातोय; जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट…
आता महा विकास आघाडीत फक्त रोहित पवारांना मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडायची बाकी आहेत… pic.twitter.com/jsF9yKgCfN— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 21, 2021
जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?
दीर्घकाळ राजकारणात काम करणाऱ्या कोणालाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटू शकते. मलाही तसे वाटणे स्वाभाविक आहे. मात्र सध्या आमच्या पक्षाकडे ते पद नाही. प्रथम पक्ष आणि आमदारांची संख्या वाढवावी लागेल. त्यानंतर पक्ष आणि खासदार शरद पवार जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, असं आपण म्हटल्याचं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.
“आपल्या हातून लोकांची सेवा आणखी जास्त घडावी या हेतूने जयंत पाटील असं काही बोलले असावेत. जयंतराव यांचं त्यांच्या मतदारसंघासोबतच पूर्ण राज्यात मोठं काम आहे. लोकांना केंद्रबिंदू ठेवून जयंत पाटील राज्यभर फिरत असतात. मुख्यमंत्री म्हटलं की काम करताना जास्त ताकद मिळते. जनतेची सेवा जास्त प्रमाणात करता येते. याच कारणामुळे जयंत पाटील असे म्हणाले असावेत” अशी सावध प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली. दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचं आम्हाला पक्षाने सांगितलं आहे, असं सांगायलाही रोहित पवार विसरले नाहीत.
जयंत पाटलांच्या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रकारांनी छेडलं असता ते इतकंच म्हणाले की, “जयंत पाटील साहेबांनी जी इच्छा व्यक्त केली आहे, त्या इच्छेला मी पाठिंबा देतो.”
पाहा व्हिडीओ :
संबंधित बातम्या :
जयंत पाटलांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पूर्ण होणार की दिवास्वप्न ठरणार?; वाचा स्पेशल रिपोर्ट
जयंतरावांच्या मुख्यमंत्री महत्वकांक्षेवर काय म्हणाले रोहित पवार?
जयंत पाटील म्हणतात, मला मुख्यमंत्री व्हायचंय, अजित पवार म्हणाले….
(BJP Atul Bhatkhalkar taunts Rohit Pawar over Jayant Patil’s dream of being Chief Minister)