मुंबई : आताच्या घडीची सगळ्यात मोठी राजकीय घडामोड समोर येतेय. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला भाजपकडून (BJP) मोठी ऑफर देण्यात आली असल्याची चर्चा आहे. राज्यात आठ कॅबिनेट (cabinet) मंत्रिपदं आणि पाच राज्यमंत्रिपदं शिंदे गटाला देण्याची ऑफर भाजपकडून देण्यात आल्याचं सांगितलं जातंय. याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. या शिवाय केंद्रातही शिंदे गटाला दोन मंत्रिपदं दिलं जातील, असं बोललं जातंय. एकनाथ शिंदे गटाचा विचार केल्यास, शिंदे यांच्याकडे 41 आमदार आणि सहा अपक्ष असे एकूण 47 आमदारांचं संख्याबळ असल्याचं बोललं जातंय. तर एकीकडे भाजपकडून शिंदेंना मंत्रीपदाची ऑफर दिली जातेय. तर दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक विधान केलंय. हे विधान सध्या चांगलंच चर्चेत आहे.
बंडानंतर एकनाथ शिंदे गट मजबूत!
आशिष जैस्वाल यांच्यासह मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर आणि दीपक केसरकर या सर्व आमदारांसह गुवाहाटी इथं पोहोचलेले आहेत. सकाळी साडे नऊ वाजता ते गुवाहाटी विमानतळावर दाखल झाले. हे सर्व आमदार गेल्या 24 तासांपासून नॉट रिचेबल होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आशिष जैस्वाल गेल्या काही दिवसांपासून नाराज होते. काँग्रेसने नेते टक्केमारी मागत असल्याचा कारणाचा आरोप करत त्यांनी उद्धव ठाकरे यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. मात्र या आरोपांवर कोणतीही कारवाई न झाल्यानं ते नाराज असल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर आता आशिष जैस्वाल हे गुवाहाटीत दाखल झालेत. शिवाय आपल्यासह आणखी तिघा आमदारांनाही आणलंय.