नवी दिल्ली : ”भाजप पक्ष कधीच व्यक्ती केंद्रीत नव्हता असे वक्तव्य भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे”. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ”भाजप हा पक्ष कधीच अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, पंतप्रधान नरेद्र मोदी किंवा अमित शाह यांचा नव्हता आणि यापुढेही नसेल”, अशा शब्दात नितीन गडकरी यांनी पक्षाची स्तुती केली आहे.
”लवकरच लोकसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट होणार आहे. यंदाच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही असा अंदाज तज्ज्ञ व्यक्ती व्यक्त करत आहेत. मात्र हा अंदाज खोटा आहे, गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदा भाजपला जास्त मत मिळतील” असा दावा नितीन गडकरी यांनी केला आहे.
काही वर्षांपूर्वी भारतात ‘इंदिरा इज इंडिया आणि इंडिया इज इंदिरा’ असं बोललं जात होते. त्यानंतर कित्येक वर्षांनी ‘मोदी म्हणजे भाजप आणि भाजप म्हणजे मोदी’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावरुन भाजप हा व्यक्तीकेंद्रीत पक्ष बनला आहे का? असा प्रश्न नितीन गडकरींना मुलाखतीदरम्यान विचारण्यात आला होता.
या प्रश्नाला उत्तर देताना, ”भाजप सारखा राष्ट्रीय पक्ष कधीच व्यक्ती केंद्रीत होऊ शकत नाही. भाजपने आतापर्यंत घराणेशाहीला स्थान दिलेले नाही आणि यापुढेही भाजपत घराणेशाहीला स्थान मिळणार नाही”, असे स्पष्टीकरण नितीन गडकरी यांनी दिले आहे.
भाजप हा पक्ष एका विचारधारेवर उभा राहिला आहे. त्यामुळे तो कधीच एखाद्या व्यक्तीवर मर्यादित राहिलेला नाही. याआधीही भाजप नेते अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्यापुरता भाजप पक्ष मर्यादित नव्हता आणि यापुढेही अमित शाह किंवा नरेंद्र मोदी यांच्यापुरता हा पक्ष मर्यादित राहणार नाही, असेही नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.
भाजपतील महत्त्वाचे निर्णय संसदीय समितीद्वारे घेतले जातात. त्यामुळे पक्षासाठी नेते आणि नेत्यांसाठी पक्ष हे एकमेकांना पुरक आहेत. तसेच जर पक्ष मजबूत असेल आणि नेता कमकुवत असेल तर कोणतीही निवडणूक जिंकता येत नाही असा टोलाही त्यांनी काँग्रेसला लगावला. तसेच त्याविरुद्ध कमकुवत पक्ष आणि लोकप्रिय नेता अशी परिस्थिती असेल तरीही कोणत्याही पक्षाला निवडणूक जिंकता येत नाही. त्यामुळे निवडणूक जिंकण्यासाठी पक्ष आणि पक्षाचे नेतृत्व करणारा नेता हे दोघेही खंबीर असणे गरजेच असते. असेही नितीन गडकरींनी स्पष्ट केले.
”गेल्या 50 वर्षात इतकी काम झाली नव्हती, तितकी गेल्या पाच वर्षात मोदी सरकारने अनेक विकासाची कामे केली आहे. त्यामुळे देशातील जनता पुन्हा एकदा भाजपला बहुमत देईल”, असे देखील गडकरी म्हणाले.