मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नेहमीच नैतिकतेचे राजकारण केलं आहे. त्यांचं राजकारण शुद्ध मानलं जातं. त्यांनी नेहमीच नैतिकतेला प्राधान्य दिलं, असं असं मोठं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. तसंच नैतिकतेच्या मुद्द्यावर सामाजिक न्यायविकास मंत्री धनंजय मुंडेंनी स्वत:हून राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. (Bjp Chandrakant Patil On Sharad pawar And Dhananjay Munde rape Case)
शरद पवारांचं राजकारण शुद्ध, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाही. पवारांचं राजकारण नेहमी नैतिकतेचं राहिलं आहे. त्यामुळे ते धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतील असा विश्वास आहे, असं पाटील म्हणाले.
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा यांनी केलेल्या आरोपींची चौकशी होईलच. पण मुंडे यांनी स्वत: कबुली दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा. त्यांचा राजीनामा नाही घेतला तर आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला.
चंद्रकांत पाटील यांनी पवारांच्या राजकारणाचं मोठंपण सांगताना धनंजय मुंडे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. पवारांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीत शुद्ध राजकारण केलं, असं सांगताना नैतिकपणा जपत मुंडेंनी मंत्रिमंडळातून बाजूला व्हावं, अशी भूमिका चंद्रकांतदादांनी मांडली.
याप्रकरणी प्रथम आरोपीला अटक करायला हवी तसंच निवडणूक आयोग यावर नक्की कारवाई करेल, हे जरी आत्ता सांगता येत नसलं तरी मुंडे यांनी घटनेच्या चौकटीत बसणारं काम केलं नाही त्यामुळे निवडणूक आयोगाने दाखल घेण्यासारखं हे प्रकरण आहे, असं मतंही त्यांनी व्यक्त केलं.
धनंजय मुंडे यांना प्रथमत: आवाहन करेल की माणूस म्हणून चूक घडू शकते. पण नैतिकतेने ते कायद्यात बसणार नाही. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. खूप राजकीय जीवन त्यांना जगायला मिळाले. या राजकीय जीवनात मंत्री न राहता नॉर्मल कार्यकर्ता म्हणून काम करायला वाव आहे. त्यांनी राजीनामा द्यावा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंबहुना शरद पवारांनी त्यांचा राजीनामा घ्यावा. जर राजीनामा घेतला नाही तर राज्यभर भाजप आंदोलन करेल, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिलाय.
विरोधी पक्षाला जिथे चुकीचं होईल तिथे विरोधाची भूमिका दिलेली असते. एक दंडशक्ती तसंच एक अंकुशशक्ती म्हणून विरोधी पक्षाने काम करायचं असतं. या शक्तीने जे चुकीचे चाललं आहे. त्याचा जाब विचारायचं असतं. लोकांनी ती जबाबदारी दिलेली असते. आम्ही तेच काम करतोय, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
(Bjp Chandrakant Patil On Sharad pawar And Dhananjay Munde rape Case)
संबंधित बातम्या
विरोधकांनी स्वत:ला आरशात पाहावे; मुंडेंच्या राजीनाम्यावरून अमोल कोल्हेंची टीका