नांदेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नांदेडमध्ये होणारी सभा रद्द झाल्याचं वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलं होतं. त्याप्रकरणी अशोक चव्हाण यांच्याविरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. या तक्रारीमुळे नांदेड मतदारसंघातून लोकसभेसाठी काँग्रेसचे उमेदवार असलेले अशोक चव्हाण अडचणीत येण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 6 एप्रिलला नांदेडमध्ये जाहीर सभा होती. त्याच दिवशी दुपारी उमरी तालुक्यातील बितनाळ येथील प्रचार सभेत अशोक चव्हाण यांनी पंतप्रधानांची सभा रद्द झाल्याचं वक्तव्य केलं होतं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पंतप्रधानांची सभा रद्द झाल्याचं वक्तव्य काँग्रेसच्या उमेदवाराने केलं, त्यामुळे हा आदर्श आचारसंहितेचा भंग असल्याची तक्रार भाजपने केली आहे.
या तक्रारीची तपासणी आचारसंहिता पथक करत आहे. यात तथ्य आढळलं, तर चव्हाणांवर आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होऊ शकतो. दरम्यान, 6 एप्रिलला संध्याकाळी पंतप्रधानांची विक्रमी सभा नांदेडला झाली. मात्र, मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य चव्हाण यांनी केल्याने सभेला काही लोक आले नाहीत, अशी तक्रार भाजपचे माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली. आता या व्हायरल व्हिडीओची सत्यता तपासली जाणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई होईल.
याबाबत अशोक चव्हाण यांना विचारलं असता ‘मी असं बोलल्याचं आठवत नाही’ असे त्यांनी सांगितले. दरम्यान, सध्याची निवडणूक अशोक चव्हाण यांना चांगलीच जड जात आहे, त्यामुळे ते काहीही बोलत असल्याची टीका विरोधीपक्षाने केली. याआधीही, समाजवादी पक्षाचा उमेदवार भाजप उमेदवाराच्या घरी गेल्याचा आरोप अशोक चव्हाणांनी केला होता. मात्र, समाजवादीच्या उमेदवाराने पत्रकारांसमोर असं काहीच घडलेलं नाही हे पुराव्यासह सिद्ध केलं होतं.