मुंबई : राज्यातील सत्ता संघर्षात अखेर भाजपची अधिकृतपणे एन्ट्री झाल्याचं पाहायला मिळतंय. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला मोठा दिलासा मिळालाय. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यात सत्तापालट होणार, अशी चर्चा सध्या जोरदारपणे सुरु आहे. अशावेळी भाजपच्या कोअर कमिटीची (BJP Core Committee) महत्वपूर्ण बैठक आज पार पडली. त्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपच्या राज्यातील पहिल्या फळीतील नेत्यांची बैठक पार पडली. त्यात भाजप राज्यातील राजकारणावर लक्ष ठेवून आहे. भविष्यातील घडामोडींच्या संबंधात कोअर टीमने लक्ष देऊन भविष्यात निर्णय घेतला जाईल, असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सांगितलं.
मुनगंटीवार म्हणाले की, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर तातडीने भाजपाच्या कोअर टीमची बैठक आमंत्रीत करण्यात आली. कोर्टाने दिलेला निर्णय, शिवसेनेत झालेली फूट, राज्यात असलेली परिस्थिती, यावर भाजपाच्या कोअर टीमने चर्चा केली. भविष्यातील घडामोडींच्या संबंधात कोअर टीमने लक्ष देऊन भविष्यात निर्णय घेतला जाईल. कोर्टाच्या निर्णयानंतर, राज्यात आणि विधिमंडळात होणाऱ्या परिस्थीतीचा अंदाज घेण्यात आला. याबाबतकची भूमिका भाजपा ठरवेल, यावर चर्चेतून निष्पन्न करण्यात आलं. सध्या भाजप वेट अंड वॉचच्या भूमिका असल्याची माहिती भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिलीय.
भाजपच्या कोअर बैठकीत सरकार स्थापनेबाबत चर्चा झाली नाही. राज्यातील अस्थित परिस्थिती, शिवसेनेतील फूट, राज्यातील मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतल्यानंतरही त्यांच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांसमोर केलेला आग्रह, याकडे भाजप लक्ष ठेवून आहे. भविष्यात ज्या घडामोडी घडतील, त्यानंतर पुन्हा कोअर कमिटीची बैठक होईल आणि मग आम्ही निर्णय घेऊ.
बंडखोर आमदारांबाबत ते स्वत: आम्ही बंडखोर नाही, तर आम्हीच खरे शिवसैनिक, 24 कॅरेट शिवसेना आम्ही असल्याचा दावा ते करत आहेत. आता संजय राऊतांच्या शब्दात बंडखोर कोण आणि नॉटी कोण हे तर येणारा काळच सांगेल. त्यामुळे मी शिवसेनेच्या कोणत्याही आमदाराला बंडखोर समजत नाही. याचा निर्णय भाजपचा आमदार म्हणून मी करणार नाही. पण शिवसेना आणि त्याचं बहुमत याबाबत अद्याप कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. बंडखोर आमदारांचा कुठलाही प्रस्तावाशी भाजपला काही देणघेणं नाही. शिवसेनेला जर ते मूळ स्वत:ची मानतात तर शिवसेनेचा प्रस्ताव आल्यास पुन्हा भाजपची कोअर कमिटी बसेल, असं सूचक वक्तव्यही मुनगंटीवार यांनी दिलंय.