मुंबई : वेदांता (Vedanta) प्रकल्प गुजरातला (Gujarat) हलवण्यात आल्यानं सध्या राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर आरोप सुरू आहेत. तर सत्ताधाऱ्यांकडून देखील विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. वेदांता प्रकल्प राज्याच्या बाहेर गेल्यानं महाराष्ट्रात होणारी मोठी गुंतवणूक राज्याबाहेर गेली. त्याचसोबत हजारो तरुणांना मिळणारा रोजगारही गेला असा आरोप विरोधकांकडून होत आहे. याच मुद्द्यावरून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी वडगाव- मावळमध्ये आंदोलन केले होते. मोर्चा काढला होता. आता या आंदोलनानंतर भाजप देखील आक्रमक झाले आहे. भाजपाचे आमदार राम कदम यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार निशणा साधाला आहे.
राम कदम यांनी वेदांताच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आदित्य ठाकरे हे खोट सांगून लोकांची दिशाभूल करत आहेत, असा आरोप राम कदम यांनी केला आहे. तसेच आदित्य ठाकरे यांनी जीथे आंदोलन केले होते, तिथेच उद्या सकाळी आम्ही हजारोंच्या संख्येनं एकत्र येऊन ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील कदम यांनी दिला आहे.
पुढे बोलताना राम कदम यांनी म्हटलं आहे की, आदित्य ठाकेर यांनी दिशाभूल न करता वेदांताच्या अॅग्रीमेंटचे पेपर्स दाखवावेत. जर त्यांच्याकडे पेपर्स नसतील तर त्यांनी हातजोडून महाराष्ट्राची माफी मागावी.
वेदांता प्रकल्प राज्याबाहेर गेला यासाठी सत्ताधारीच जबाबदार आहेत असा आरोप विरोधकांकडून होत आहे. या प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोठं आंदोलन देखील झालं. मात्र या आंदोलनानंतर आता भाजप देखील आक्रमक झाले असून, आदित्य ठाकरे यांनी जिथे आंदोलन केले तिथेच उद्या आंदोलन करणार असल्याचा इशारा राम कदम यांनी दिला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा वेदांताच्या मुद्द्यावरून राजकारण तापण्याची शक्याता आहे.