मुंबई : गेले दोन वर्ष राज्यावर कोरोनाचे संकट होते. कोरोना काळात राज्यात अनेक निर्बंध घालण्यात आले. निर्बंधांचा परिणाम हा सणोत्सवांवर देखील झाला. गेले दोन वर्ष भाविकांनी आपल्या घरीच सण साजरे केले. मात्र यंदा कोरोना संकट कमी झाल्याने सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा झाला. यावरून आता भाजप (BJP) नेत्यांकडून तत्कालीन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारवर टीका करण्यात येत आहे. भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी पुन्हा एकदा याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांना डीवचले आहे. 12 कोटी जनतेला अडीच वर्षांत सण साजरे करता आले नाहीत, ते गणेशोत्सव आणि दहीहंडीच्या शुभेच्छा द्यायलाही विसरले असं म्हणत कंबोज यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
भाजप आणि शिंदे यांचं सरकार महाराष्ट्रात आल्यामुळेच जनतेला निर्बंधमुक्त सण साजरा करता येत आहेत. असा दावा वारंवार भाजप नेत्यांकडून केला जात आहे. मोहित कंबोज यांनी देखील असाच दावा केला आहे. गेले अडीच वर्ष सण साजरा करता आले नाही, ते दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या शुभेच्छा द्यायला देखील विसरले असं म्हणत कंबोज यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
दरम्यान दुसरीकडे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी भाजप नेत्यांना याच मुद्द्यावरून सडेतोड उत्तर दिले आहे. राज्यात निर्बंध लावल्यामुळेच आज आपण सण साजरा करत आहोत. उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयामुळे राज्यातील हजारो जणांचे प्राण वाचले. अन्यथा इतर राज्यांसारखी परिस्थिती आपल्याकडे निर्माण झाली असती असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.