मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव प्रस्तावावरुन विधानसभेत राडेबाजी (Savarkar honour proposal Maharashtra Vidhan sabha) पाहायला मिळाली. सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपने त्यांच्या गौरव प्रस्तावासाठी आग्रह धरला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सत्ताधाऱ्यांनी सावरकरांचा गौरव प्रस्ताव मांडावा अशी मागणी लावून धरली. त्यासाठी विरोधकांनी विधानसभेत एकच गोंधळ घातला. (Savarkar honour proposal Maharashtra Vidhan sabha)
सावकरांच्या गौरव प्रस्ताव नाकारल्याने विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “काँग्रेसचं मुखपत्र असलेल्या ‘शिदोरी’ या मासिकात सावरकरांना बलात्कारी म्हटलंय, माफीवीर म्हटलंय, त्या मासिकावर बंदी घालावी. या मासिकातील तपशील वाचताना मला लाज वाटतेय. सावरकरांनी देशासाठी मोठं योगदान दिलंय. त्यांचा सन्मान झालाच पाहिजे”
Bharatiya Janata Party demands to introduce a resolution in Maharashtra Legislative Assembly to honour Vinayak Damodar Savarkar on his death anniversary.
— ANI (@ANI) February 26, 2020
दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार यांनीही अध्यक्षांना प्रस्ताव देत सत्तापक्षाने दोन ओळींचा सावरकर गौरव प्रस्ताव मांडावा अशी मागणी केली. तसंच देशासाठी प्रचंड कष्ट झेलणाऱ्या स्वातंत्र्यवीराच्या गौरवासाठी जर इतका संघर्ष करावा लागत असेल तर ते लाजीरवाणं आहे असं मुनगंटीवार म्हणाले. यावेळी देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवारांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला.
शिवसेनेचं उत्तर
भाजपच्या या मागणीनंतर शिवसेनेकडून परिवहन मंत्री अनिल परब यांनी उत्तर दिलं. “अध्यक्षमहोदय, भाजपने जो प्रस्ताव मांडलाय, त्याची तपासणी करुन योग्य तो निर्णय घेऊन सभागृहाचं कामकाज सुरु करावं. नितेश राणे यांचंही मत या प्रस्तावाबाबत घ्यावं. त्यांना तसा प्रस्ताव मांडायला सांगा. त्याहून पुढे सांगतो, सावरकरांना भारतरत्न द्यायचा की नाही त्याबाबतचा निर्णय आधी घ्या. त्यांना भारतरत्न जाहीर करा, त्यानंतर तुमच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आम्ही मांडतो, तुमचा आणि मोदी साहेबांचा अभिनंदनाचा प्रस्ताव मांडतो”, असं अनिल परब म्हणाले.
अजित पवारांची प्रतिक्रिया
दरम्यान या सर्व वादानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपलं निवेदन मांडलं. “सावरकरांचं योगदान विसरुन चालणार नाही. त्यांच्या देशसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आम्ही सुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानतो. केंद्रात सत्ता असून त्यांना भारतरत्न का दिला नाही माहित नाही. दोन वेळा देवेंद्र फडवणीस यांनी पत्र दिले आहे. पाच वर्ष त्यांचं सरकार होतं, मात्र आजच गौरव प्रस्ताव का? सावरकरांचं योगदान आहे, पण त्यांच्याबाबत वेगवेगळी मतं आहेत. सावरकर विज्ञानवादी होते, गाय-बैलांबाबत त्यांचं मत काय होतं हे सर्वांना माहित आहे. त्यामुळे प्रत्येकाची आपआपली मतं असू शकतात”, असं अजित पवार म्हणाले.